पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज (बुधवारी, २८ फेब्रुवारी) यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. यानिमित्ताने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत स्थानिक खासदार भावना गवळी यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी महायुतीतून दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याचं म्हटलं जातंय. त्यावर भावना गवळी यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.

“२०१४, २०१९ साली मोदी यवतमाळमध्ये आले होते, आणि २०२४ मोदी येत आहेत. ते ज्या ज्या वेळेला येथे आले तेव्हा शुभ संकेतच मिळाले आहेत. हा महिलांचा मेळावा आहे, या मेळाव्यासाठी मोदी येत आहेत. ते महिलांना संबोधित करणार आहे. हा महिलांसाठी महत्त्वाचा मेळावा आहे. तसंच, यवतमाळच्या रेल्वेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा दौरा आहे”, असं भावना गवळी म्हणाल्या.

“यवतमाळकरांचा पायगूण चांगला आहे. २०१४ मध्ये ते चाय पे चर्चासाठी यवतमाळमध्ये आले होते. त्यानंतर ते पंतप्रधान झाले. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी रेल्वेची कामे मार्गी लावली. या सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत”, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> निवडणुकीपूर्वी यवतमाळमध्ये सभा घेण्याचा पंतप्रधान मोदी यांचा पायंडा कायम

माझ्या उमेदवारीला नेहमीच विरोध

महायुतीच्या जाहिरातीतून तुमचा फोटो वगळण्यात आला. तुमच्या उमेदवाराला विरोध होतोय का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, “माझ्या उमेदवारीला प्रत्येकवेळी विरोध होतो. पण प्रत्येकवेळेला मी माझाच रेकॉर्ड तोडलेला आहे. त्यामुळे त्या फोटोत मला इंटरेस्ट नाही. मोदी येणार आहेत, त्यात मला इंटरेस्ट आहे. लाखो महिलांसमोर मोदी बोलणार आहेत”, असं गवळी म्हणाल्या.

हेही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये; महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

“आम्ही १३ खासदार शिंदेंबरोबर गेलो होतो. तेव्हा आम्हाला आश्वासित केलं होतं की यापुढेही तुम्हाला कायम ठेवणार. त्यामुळे माझी उमेदवारी कोणाला देण्याचा प्रश्नच येत नाही. या उमेदवारीवर माझाच दावा आहे, मी सलग पाचवेळा निवडून आले आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला आहे की जी सातत्याने निवडून येते. म्हणून मी म्हणते की मै अपनी झांशी नहीं दुंगी”, असा इशाराही त्यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची काल बैठक झाली. मागच्या निवडणुकीत २२ खासदार लढले होते. आता शिंदेंकडे शिवसेना आणि धनुष्यबाण आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच क्लेम असायला पाहिजे”, असंही त्या म्हणाल्या.