वाई : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे आणि साताऱ्याचे  छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साताऱ्यात भेट झाली. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी (ता सातारा) येथे ही धावती भेट झाली असून भविष्यात दोन्ही राजे एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कोल्हापूर-सातारा घराण्याचे ऋणानुबंध असेच राहोत असं  ट्विट संभाजीराजेंनीच यानंतर केले. छत्रपती संभाजीराजे मुंबईहून कोल्हापूरकडे जात होते तर आमदार शिवेंद्रसिंहराजे अजिंक्यतारा साखर कारखान्याहून सातारा शहराकडे येत होते. दोन्ही राजेंच्या भेटीने चर्चेला मात्र आता उधाण आले आहे. छत्रपती संभाजी राजेंचा गेम केला असल्याचे वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आणि शिवसेनेचे आमदार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना प्रत्युत्तर देत आगीत तेल ओतू नये असे सांगत टीका केली होती. त्यामुळे या भेटीमागे नक्की काय दडलंय हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

शाहू छत्रपती आणि युवराज संभाजीराजे छत्रपती या पिता-पुत्राच्या राजकीय भूमिकांची सध्या राज्यात चर्चा सुरू असताना आज शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांची अचानक भेट झाली. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी ‘कोल्हापूर आणि सातारा घराण्याचे ऋणानुबंध असेच राहोत’ असं ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी म्हटलं आहे,की आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अचानक भेट झाली. महामार्गावर असूनसुद्धा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली व आपुलकीने चौकशी केली. आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच राहोत, हीच आई भवानीचरणी प्रार्थना! असे ट्विट त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही. हा छत्रपती घराण्याचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र शाहू छत्रपती यांनी यावर बोलताना संभाजीराजेंनी कुटुंबीयांना विचारुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नव्हता, त्यामुळं हा छत्रपती घराण्याचा अपमान म्हणता येणार नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीच संभाजीराजेंना अपक्ष लढवण्याचा डाव रचून बहुजनांच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही कोल्हापुरात छत्रपतींच्या निवासस्थानी जाऊन शाहू छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली होती. छत्रपती घराण्याचे आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच आपल्याला इथं पाठवल्याचेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान, साताऱ्यातील या भेटीनंतर भविष्यात दोन्ही राजे एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.