मोटरमनच्या प्रसंगावधानानंतर मोठा अनर्थ टळला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड : रेल्वे स्थानकात दुपारी एकच्या सुमारास परळी-अकोला ही प्रवासी गाडी उभी असताना अचानक एका इसमाने इंजिनचा ताबा घेऊन गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. गाडी सुरू होऊ लागल्याने प्रवासी व सर्वच जागेवर बसले. मात्र, काही क्षणातच मोटारमनला दुसराच कोणीतरी इसम गाडी सुरू करत असल्याचे कळताच तो अधिकाऱ्यांसह धावला. प्रसंगावधान राखून मोटारमनने आत घुसून या इसमाला पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले, तेव्हा तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले. काही क्षणात गाडी सुरू होऊन धावली असती, तर काय अनर्थ घडला असता, या कल्पनेनेच अनेकांचा थरकाप उडाला.

बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे स्थानकात मंगळवारी दुपारी एक वाजता नेहमीप्रमाणे परळी-अकोला ही प्रवासी गाडी उभी होती. मोटारमन व इतर अधिकारी वेळ झाल्याने गाडीकडे निघणार होते. इतक्यात इंजिनचा ताबा घेऊन कोणीतरी भलताच व्यक्ती गाडी सुरू करत असल्याचे मोटारमनच्या लक्षात आले. गाडी सुरू होण्याची वेळ झाल्याने प्रवासीही जागेवर बसले होते. मोटारमनने काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तत्काळ इंजिनकडे धाव घेतली. मात्र, हा इसम खाली उतरण्यास तयार नव्हता. तो गाडी सुरू करण्याच्या प्रयत्नातच होता. प्रसंगावधान राखून मोटारमनने इंजिनमध्ये प्रवेश करून इसमाला बाहेर काढले. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले.

तब्बल ४० मिनिट इंजिनजवळ सुरू असलेल्या गोंधळाने भलताच इसम गाडी सुरू करत असल्याचे प्रवाशांना कळाले तेव्हा प्रवासीही हादरून गेले. मात्र, या इसमाला खाली उतरवण्यात यश आल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mentally challenged man attempt to start train in parli zws
First published on: 26-06-2019 at 00:24 IST