लातूर : मेट्रो ही केवळ मोठय़ा शहरांपुरती मर्यादित न राहता मराठवाडयमतील शहरांसाठीदेखील सुरू करता येऊ शकते. लातूरसारख्या शहराची आगामी काळात ती गरज असून या भागात मेट्रो सुरू करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

१ हजार २३ कोटी रुपयांच्या जिल्हयमतील रस्त्याच्या लोकार्पण व भूमिपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे, संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड, अभिमन्यू पवार, बाबासाहेब पाटील या आमदारांसह जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, गुरुनाथ मगे, अरिवद पाटील आदी उपस्थित होते. 

प्रारंभी खासदार सुधाकर श्रुंगारे यांनी आपल्या भाषणात नदीजोड प्रकल्प मार्गी लावण्याचे आवाहन केले. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अटलजींनंतर सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून देशात गडकरी ओळखले जातात असे सांगत लातूरला केंद्रीय विद्यापीठ देण्याची मागणी केली. करोनाच्या नंतर जिल्हयमतील ही पहिलीच मोठी सभा झाली व या सभेला १० हजारपेक्षा अधिक लोक उपस्थित होते.

  •   सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्च करून सूरत – नाशिक – नगर – सोलापूर -हैदराबाद – बेंगलोर – चेन्नई हा नवीन राष्ट्रीय महामार्ग करण्यात येणार आहे. दक्षिणेत जाण्यासाठी आता पुणे, मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. या महामार्गाला मराठवाडा व त्यातही लातूर जिल्हा कसा जोडता येईल याचा आपण विचार करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले म्हणाले.
  •   लातूरकरांची मागणी लक्षात घेऊन लातूर – टेंभुर्णी रस्त्याचे काम सुरू करून तो रस्ता चौपदरी केला जाईल. लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी आतापर्यंत ५ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. आगामी काळात ४ हजार कोटी रुपये आपण जिल्ह्याच्या रस्त्यासाठी देणार असल्याचे ते म्हणाले.
  •   लातूर शहरातील सर्व रिंगरोड केंद्रीय रस्ते वाहतूक विभागातून करण्यात आले आहेत. एक रस्ता राहिला आहे, तोही पूर्ण केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
  •   नव्याने बनणारे हे रस्ते युवकांचे भवितव्य घडवतील व युवकांना नवे रोजगार देतील. उद्योगधंद्यांबरोबर रस्त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत आहे. नदी व तलावाचे खोलीकरण करून ते मुरूम रस्त्यासाठी वापरले जाते व यातून सिंचन क्षेत्रात भरीव वाढ होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.