छत्रपती संभाजीनगर – मराठवाडय़ासारख्या कायम पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागात मेक्सिकोतील अ‍ॅव्होकॅडो नावाच्या फळ पिकाची लागवड होत आहे. पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण परिसरात सहा एकरवर अ‍ॅव्होकॅडोची ५५० रोपांची लागवड करण्यात आली असून, आणखी ६५० रोपे लावण्यात येणार आहेत.  गंगामाई कृषी उद्योग संस्थेकडून अ‍ॅव्होकॅडोसह पिवळे खजूर, ड्रॅगन आदी विदेशी फळांच्या शेतीचे प्रयोग केले जात आहेत. अ‍ॅव्होकॅडो हे फळ मेक्सिकोतील आहे. आरोग्याच्या विविध समस्यांवर गुणकारी ठरत असल्याचा दावा केला जातो. विशेष म्हणजे अल्प पाण्यावर येणारे फळ आहे. अ‍ॅव्होकॅडोसाठी ३० अंशांपर्यंत तापमान लागते. त्यासाठी ब्रह्मगव्हाणमधील सहा एकर जागेवर तापमानाचा फटका बसणार नाही, अशी पिकासाठी आच्छादन व्यवस्था करण्यात आली आहे. मराठवाडय़ात बहुतांश भागात ४२ अंशांपुढे तापमान जात नाही. आच्छादनामुळे आवश्यक तेवढे तापमान ठेवता येते.  गंगामाई संस्थेचे व्यवस्थापक मोहन तपसे यांनी सांगितले, की भारतात या फळाची लागवड उत्तराखंड भागात केली जाते. ब्रह्मगव्हाण परिसरात सहा एकरवर अ‍ॅव्होकॅडो लागवडीचे प्रयोग संस्थेचे अध्यक्ष पद्माकर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी अ‍ॅव्होकॅडोची ५५० रोपे लावण्यात आली आहेत. आणखी ६५० रोपे जुलै-ऑगस्ट महिन्यात लावण्यात येणार आहेत. तीन ते साडेतीन वर्षांनंतर फळधारणा होते. सध्या अ‍ॅव्होकॅडोच्या फळांना मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. फळामध्ये अधिक स्निग्धता असल्याने त्याला बटर फ्रुटही म्हणतात. तर बेटा सेटोस्टेरॉल हा प्रमुख घटक असतो. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. ८.५ ग्रॅम काबरेहायड्रेट्स, एक ग्रॅमपेक्षाही कमी साखरेचे प्रमाण, ६.७ फायबर, तर १४.६० ग्रॅम फॅट असल्याची माहिती देण्यात आली.

फळामध्ये कुठले घटक?

जीवनसत्त्वापैकी मॅग्नेशिअम, रिबो फ्लेविंग (बी-२), नायसिन (बी-३), पेंटोथेमिक अ‍ॅसिड (बी-५), पायरोडॉक्सिन (बी-६), जीवनसत्त्व सी, ई, के, डी-६, स्निग्धता असे सत्त्व अ‍ॅव्होकॅडो फळात आढळतात.

ब्रह्मगव्हाणमध्ये लागवड केलेले अ‍ॅव्होकॅडो हे फळ हस प्रकारातले. या फळामध्ये िपकरटन, बॅकोन, रिड, गेन, कास्मेन आदी प्रकार असतात. हृदयाशी संबंधित आजारात गुणकारी फळ आहे. याशिवाय मेंदू, डोळय़ांची कार्यक्षमता वाढवणे, रक्तदाब, मधुमेह, वजन नियंत्रणात ठेवणे, पचनक्रिया सुधारणे आदी आजार-व्याधींमध्ये उपयुक्त आहे. मुंबईत मेक्सिको फळाचा दर दीड हजार ते अठराशे रुपये किलो, तर यातील देशी प्रजातीतील फळाचा दर ६०० ते ८०० रुपये किलोपर्यंत आहे.

– सुरेंद्र देशमुख, महाव्यवस्थापक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.