सातारा : म्हसवड (ता. माण) येथील लाखो भाविकांचे कुलदैवत व येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ, देवी जोगेश्वरी देवस्थानचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहादिवशी रात्री १२ वाजता धार्मिक विधीपूर्वक, पारंपरिक पद्धतीने मोठ्या संख्येतील भाविकांच्या उपस्थितीत थाटात झाला. तब्बल महिनाभर चालणाऱ्या श्रींच्या मंगल विवाह सोहळ्याचा शुभारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व श्रींच्या हळदी समारंभाने झाला. तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी, सालकारी रामचंद्र गुरव यांच्या हस्ते आरती करून मानकरी, सेवेकरी व नवरात्रकरींच्या उपस्थितीत श्रींचे १२ दिवसांचे घट उठविण्यात आले. घट उठविल्यानंतर १२ दिवसांच्या नवरात्राच्या उपवासाची सांगता होऊन उपवास सोडण्यात आले. या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विवाहासाठी श्री सिद्धनाथ हे हत्तीवरून गेले होते, अशी आख्यायिका असल्याने व मंदिरातील बाहेरच्या मंडपात सहा फूट लांब व साडेचार फूट उंचीचा अखंड पाषाणाच्या हत्तीचे शिल्प आहे. या शाही विवाह निमित्त हत्तीच्या मूर्तीची आकर्षक अशी सजावट करून सुशोभित केलेली अंबारी हत्तीवर बसविण्यात आली. संध्याकाळी पाच वाजता श्रींची पंचधातूची उत्सवमूर्ती हत्तीवरील अंबारीत विधीपूर्वक बसविण्यात आली. अर्थात विवाहाला जाण्यासाठी ‘वर’ सज्ज झाला.

नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, उसाच्या मोळ्या, भव्य अशा मंदिराचे प्रांगण व शिखरास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर हत्ती मंडपाच्या मागील प्रांगणात गावोगावच्या भाविकांचा गजी-ढोलाचा कार्यक्रम अखंड सुरू होता. विवाहानिमित्त श्रींच्या मूर्तीसमोर चौक भरण्याचे व तेल उतरण्याचे काम पूर्ण होताच सालकरी यांनी वर श्री सिद्धनाथाची उत्सवमूर्ती मिरवणुकीने हत्ती मंडपात आणताच हत्तीवरील अंबारीत स्थानापन्न करण्यात आली. त्यानंतर हत्तीसमोरच दुतर्फा पेटत्या दिवट्या हातात घेऊन मानकरी दोन रांगेत उभे राहिले. विवाहाच्या घटिका वेळ जवळ येताच रात्री साडेअकराच्या सुमारास हत्तीवरील अंबारीत स्थानापन्न केलेली श्रींची उत्सवमूर्ती सालकऱ्यांच्या छातीला बांधून मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात नेण्यात आली. बाहेरील हत्ती मंडपातून आतील गाभाऱ्यात श्रींची मूर्ती नेत असताना हजारो भाविकांची श्रींच्या मूर्तीस स्पर्श करण्यासाठी धडपड सुरू होती.

सालकऱ्यांसह श्रींची मूर्ती आतील गाभाऱ्यात नेण्यासाठी पुजारी मंडळी पुढे जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. ही रणधुमाळी सुमारे अर्धा तास सुरू होती. शेवटी मोठी रस्सीखेच होऊन श्रींची मूर्ती गाभाऱ्यात नेण्यात आली. त्यानंतर जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर आंतरपाट धरून पारंपरिक पद्धतीने विधीपूर्वक पिंटू पाठक, प्रज्योत पाठक आदी पुरोहितांमार्फत मंगलाष्टक म्हणून श्रींचा शाही विवाहसोहळा रात्री १२ वाजता सनई-चौघडा, ढोल-ताशा, बँड, गजी झांज यांच्या जल्लोषात व आतषबाजीत मोठ्या थाटात झाला. यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार श्रींच्या विवाह सोहळ्यानंतर मंदिरातील तुळसी विवाह तसेच पुजारी मंडळीच्या घरातील तुळसी विवाह झाला. या शाही विवाह सोहळ्यासाठी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रविकिरण गुरव, उपाध्यक्ष गणेश गुरव, वैभव गुरव, विश्वस्त सागर गुरव, मार्तंड गुरव, बजरंग गुरव, अजित गुरव, हरिभाऊ गुरव, महेश गुरव, सचिव दिलीप कीर्तने, श्रींचे मानकरी, सेवेकरी, नवरात्रकरी, दिवट्यांचे मानकरी, मानाच्या करवल्या, पुरोहित, पुजारी मंडळींनी परिश्रम घेतले. श्रींच्या शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता देवदिवाळीस रथातून वधू-वराची वरात काढून केली जाणार आहे.

श्रींचा विवाह मंदिराच्या गाभाऱ्यात होतो. त्यामुळे बाहेरील भाविकांना तो पाहता येत नाही, ही अडचण ओळखून मंदिर देवस्थान ट्रस्टने हत्ती मंडपामागे मोठ्या पडद्यावर व ज्या भाविकांना या विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही त्या भाविकांना घरी बसून हा सोहळा पाहता येईल, यासाठी ऑनलाईन दर्शनाची सोय केली होती.