सांगली : वीज दरवाढीने औद्योगिक वापराच्या पाण्याचे दर १७ टक्के वाढले असून याची अंमलबजावणी चालू महिन्यापासून करण्यात येणार आहे. तशा नोटीसा औद्योगिक महामंडळाकडून उद्योजकांना पाठविण्यात आल्या आहेत. यामुळे वीज दरवाढीने हैराण झालेल्या उद्योगावर आणखी एक संकट आले असल्याचे न्यू इंडिया टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी शुक्रवारी सांगितले.
महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाने आकारला जात असलेला प्रति एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर पाण्याला १६ रुपये या दरात तब्बल १७ टक्के वाढ केली आहे. हा दर आता १८.७५ रुपये प्रती घनमीटर असा केला आहे. या दरवाढीबाबत महामंडळाने नुकतीच सर्व उद्योजकांना पत्रे पाठवीली असुन सदर दरवाढ १ सप्टेंबर २०२५ पासुन लागु होत असल्याचे सप्टेंबर महिना सुरु झाल्यावर कळविले आहे.
या पत्रामध्ये सदरची दरवाढ ही राज्याच्या जलसंपत्ती प्राधिकरणाने वाढविलेली पाणीपट्टी व वीज नियामक आयोगाच्या मान्यतेने वाढलेल्या वीज दरामुळे करावी लागत असल्याचे नमुद केले आहे. नुकत्याच झालेल्या वीज दरवाढीच्या फटक्यातून राज्यातील उद्योग क्षेत्र सावरण्यापूर्वीच एमआयडीसीने पाणीदरवाढीचा आणखी एक दणका दिला आहे.
या अगोदर वीज दरात सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, इंधन अधिभार वाढविण्यात आला. यामुळे वीज दरात अप्रत्यक्ष वाढच झाली आहे. आता पाणी दरात वाढ झाल्याने उद्योगावरील मासिक खर्च वाढणार आहे. अमेरिकेने वाढविलेल्या आयात करामुळे अगोदरच उद्योग अडचणीत आले असताना पाणी आकारणीही वाढविण्यात आल्याने उद्योग धंदे अडचणीत आले आहेत. औद्योगिक विकास महामंडळात नव्याने उद्योग उभे राहण्याऐवजी कसे तरी सुरू असलेले उद्योग बंद पडण्याचा धोका आहे. याचा रोजगार संधीवरही प्रतिकूल परिणाम होणार आहे. राज्यातील उद्योगक्षेत्राचा बुडता पाय आणखी खोलात जाणार आहे.
एमआयडीसीने वाढलेली भांडवली गुंतवणुक व खर्चाचे कारण देऊन उद्योजकांच्यावर एकतर्फी दरवाढ लादली आहे. परंतु उद्योगक्षेत्रातील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरची कमाल गुणवत्ता व किमान विक्री किंमतीची प्रचंड स्पर्धा तसेच अमेरिकेने वाढविलेल्या आयात कराने निर्यातीवर झालेल्या प्रतिकुल परिणामाच्या पार्डभुमीवर उद्योजकांच्या वाढलेल्या उत्पानखर्चाची दरवाढ बाजारपेठेत कोणाकडुन घ्यावी असा गहन प्रश्न उद्योजकांसमोर उभा ठाकला आहे.
सबब या सर्व परिस्थितीचा गांभिर्यपूर्वक विचार करता राज्य शासनाने सदरची पाणीदरवाढ रद्द करावी अशी मागणी कार्वे औद्योगिक विकास केंद्रातील न्यु इंडिया टेक्सटाईल पार्कच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांना करण्यात आली असल्याचे किरण तारळेकर यांनी सांगितले.