लोकसभा निवडणुकीस एकत्र सामोरे जाणारे वंचित बहुजन आघाडी व एमआयएम आता विधानसभेसाठी स्वबळ अजमावणार असल्याचे दिसतं आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत युती असणार की नाही, हे अद्याप स्पष्ट केलेले नसले तरी, एमआयएमकडून चार उमेदवारांची आज घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील युतीची शक्यता काहीशी धुसर दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच यांची युती तुटल्याच्या बातम्या येत असताना, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितबरोबर जाण्याचे संकेत दिले होते. मात्र, आज अचानक एमआयएमकडून चार उमेदवारांची नावं घोषित करण्यात आल्यानं आता एमआयएम-वंचित आघाडी विधानसभेला स्वबळावर सामोरी जाणार असल्याचं दिसत आहे.

एमआयएमकडून रविवारी पुणे छावणीमधून हिना शफीक मोमीन, सोलापूर मध्यमधून फारूख मकबूल शाब्दी, सोलापूर दक्षिणमधून सुफिया तौफिक शेख व सांगोला (सोलापूर) मतदारसंघातून शंकर भगवान सरगर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या अगोदरही एमआयएमकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत एकूण सात जागांवरील उमेदवार एमआयएमकडून निश्चित करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीनेच ही यादी जाहीर करत असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. पत्रकाखाली एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील यांची स्वाक्षरी आहे.