कोल्हापूर : नांदणी जैन मठातील महादेवी हत्ती परत करण्यासाठी वनतारा पशु संग्रहालयाचे व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचा दावा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी येथे संबंधित व्यवस्थापनासोबत झालेल्या एका बैठकीनंतर केला.
नांदणी जैन मठातील महादेवी हत्ती गुजरात मधील वनतारा पशु संग्रहालयाकडे पाठवण्याच्या घटनेपासून कोल्हापुरात सुरू झालेल्या निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित पशु संग्रहालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करनी शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांची कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांच्या उपस्थितीत अन्य लोकप्रतिनिधी, मठाचे अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक पार पडली. यानंतर आबिटकर यांनी हा दावा केला.
नांदणी जैन मतातील महादेवी कथा माधुरी हत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरात मधील पशु संग्रहालयाकडे पाठवण्यात आल्यानंतर या संग्रहालयाचे व्यवस्थापन असलेल्या अंबानी उद्योग समूह विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या मोबाईल सेवेवरही कोल्हापूर परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त करत बहिष्कार टाकला जात आहे. हा रोख लक्षात घेऊन या पशु संग्रहालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करनी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जिनसेन भटारक पट्टाचार्य महास्वामी व विहान करनी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने यांच्यामध्ये गुप्त बैठक पार पडली.
याबाबत पालकमंत्री आबिटकर म्हणाले, माधुरी हत्तीबाबत जनतेची भावना लक्षात घेता कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मार्ग काढावा लागेल. खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी यासंदर्भात केंद्रीय वनमंत्री यांच्याशी संवाद साधून माहिती सादर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे कोल्हापुरकरांच्या भावना सादर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हत्तीच्या पुनर्प्राप्तीसाठी कायदेशीर प्रक्रिया आणि जनभावना दोन्ही महत्त्वाच्या आहेत.
वन विभागाकडून आवश्यक पत्रव्यवहार सुरू असून, तो पूर्ण झाल्यानंतर माधुरीच्या पुनर्प्राप्तीसाठीचा मार्ग मोकळा होईल, असा दावाही आबिटकर यांनी केला. जिल्ह्यातील आजरा, चंदगड, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यांमध्ये जंगली हत्तींचा त्रास वाढल्यामुळे त्यावरील उपाययोजनांसाठी एक स्वतंत्र समिती जिल्ह्यात येणार असून, नागरिकांना या त्रासातून दिलासा देण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे आबिटकर म्हणाले.