सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आणि शहरातील मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सोमवारी जाहीर केले. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, भाजपमध्ये त्यांचा मानसन्मान राखला जाईल, असे सांगत वसंतदादा घराण्यातील व्यक्ती भाजपमध्ये आल्याने जिल्ह्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल, असे सांगितले.
श्रीमती पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि भाजप असे दोन पर्याय पक्षप्रवेशासाठी होते. बुधवारी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.
सोमवारी पालकमंत्री पाटील यांनी श्रीमती पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या समवेत आ. सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सी. बी. पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, ‘वसंतदादा घराण्यातील व्यक्ती भाजपमध्ये प्रवेश करत आहे हे पक्षासाठी महत्त्वाचे आहे. त्यांनी कोणत्याही अटी, मागण्यांशिवाय प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक दिली जाईलच, पण जिल्हा नियोजन मंडळात दोन जागा त्यांच्यासाठी आहेत. त्यांपैकी एक त्यांच्यासाठी, तर दुसरी जागा त्या सुचवतील त्यांना देण्यात येईल. दरम्यान, भाजप प्रवेशाबाबत पाटील यांनी सांगितले, की काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी केली होती. आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक मिळावी, अशी आमची भावना असून, भाजपकडून त्याची खात्री वाटल्यानेच आपण हा निर्णय घेतला.