कोल्हापूर : लिंगनूर कापशी (ता. कागल ) येथून रविवारी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासह भाविक यामध्ये सहभागी होत विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले.
लिंगनूर कापशी येथील ग्रामस्थांची दिंडीप्रमुख कै. रामचंद्र ढेंगे दिंडीने आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी श्री. विठ्ठलपंथी दिंडी व श्री. दत्तपंथी भजनी मंडळाच्या गजरात दिंडी निघाली. दिंडीमध्ये गळ्यात वीणा आणि टाळ घेऊन मंत्री मुश्रीफ सहभागी झाले.
टाळ मृदंगाच्या निनादात विठोबा रखुमाईच्या गजराने अवघा गाव दुमदुमला. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील दिंडीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना २५ हजारांहून अधिक रेनकोट वाटपास सुरुवात झाली. यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, विकास पाटील, माजी सरपंच मयूर आवळेकर, भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.