कराड : उद्धव ठाकरेंनी स्वतःच ‘ठाकरे ब्रॅण्ड’ अजून सुरू झालेला नाही हे मान्य केले. म्हणजेच त्यांनी त्यांच्या ब्रॅण्डचं अस्तित्वच नसल्याचे कबूल केले आहे. केवळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाखाली स्वतःचं नाणं चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा आता काही उपयोग होणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

कराडमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. ठाकरे ब्रॅण्ड आतापर्यंत अस्तित्वात नव्हता का? असा सवाल करत महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रॅण्ड आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील, असे शंभूराज यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांना मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ काढलेल्या ‘हंबरडा मोर्चा’संदर्भात विचारले असता शंभूराज म्हणाले, त्यांच्या आघाडी सरकारच्या काळातही राज्यातील शेतकऱ्यांवर अनेक संकटे आली होती. पण, त्यावेळी त्यांनी जेवढी मदत दिली नव्हती, तेवढी मदत महायुती सरकारने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे आता लोक सुज्ञ आहेत, कोण मदत करते आणि कोण केवळ आश्वासने देतात, हे त्यांना ठाऊक असल्याची टीकाही शंभूराज यांनी केली.

३२ हजार कोटींची एकगठ्ठा मदत

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने तब्बल ३२ हजार कोटी रुपयांची एकगठ्ठा मदत (पॅकेज) दिल्याचे शंभूराज यांनी निदर्शनास आणले. लोकांच्या सहानुभूतीवर राजकारण करणाऱ्यांना आता लोक उत्तर देतील, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

कोणीही वंचित राहणार नाही

अतिवृष्टी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, ज्या ठिकाणी ७० टक्के पेरण्या रखडल्या त्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे. या प्रश्नावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे तसेच अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्थळ पाहणीचे आदेश दिले आहेत. पुरवणी यादीत जिल्ह्यातील अन्य नुकसानग्रस्त तालुक्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी या वेळी दिली.