दापोली – रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड परिसराच्या औद्योगिक विकासासाठी एमआयडीसीची निर्मिती करणे गरजेचे आहे. या भागात उद्योग येण्यास तयार आहेत. त्यामुळे महामार्ग लगत जागेची निश्चिती करून सर्वेक्षण करावे, असे आदेश गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले आहेत.
या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे एमआयडीसीचे सह आयुक्त कुणाल खेमनार, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल, क्षेत्रीय अधिकारी वंदना खरमारे तर मंत्रालयात उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, अवर सचिव किरण जाधव उपस्थित होते.
राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, मंडणगड एमआयडीसी साठी सपाट जमिनीची आवश्यकता आहे. या जमिनीचा शोध घेण्यात यावा. तसेच या व्यतिरिक्त अतिरिक्त १५० एकर जमिनीचे संपादन करावे. आंबवडे गावाच्या महामार्गावर जमीन असल्यास ती घ्यावी. जमिनीचा ‘कंट्रोल सर्वे’ करण्यात यावा. संबंधित यंत्रणांनी जागेची पाहणी करून अहवाल द्यावा, अशा सुचना ही त्यांनी केल्या आहेत.
मंडणगड परिसरात एमआयडीसी झाल्यास येथील तरुणांना रोजगार मिळेल. या भागात उद्योगांसाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे. या एमआयडीसीचा भविष्यात अधिकाधिक विस्तार होण्यासाठी अतिरिक्त योग्य जमिनीचा शोध घ्यावा, असेही राज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितले.