आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या वडिलांना त्यांच्या अल्पवयीन मुलाने संपवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला. बीड जिल्ह्यातील पूस या गावात ही घटना घडली. १६ ऑगस्टच्या रात्री १.३० च्या सुमारास अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांना संपवलं. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे.

नेमकी काय घडली घटना?

अंबाजोगाई तालुक्यातील पुस या ठिकाणी राहणारा एक गृहस्थ त्याच्या पत्नीवर कायमच चारित्र्यावरुन संशय घेत होता. तसंच तो रोज दारु पिऊन घरी यायचा आणि पत्नीवर संशय घ्यायचा. १६ ऑगस्टच्या दिवशी आई घरी असताना मुलाने वडिलांना फोन केला आणि जेवणाबाबत विचारणा केली. मात्र वडिलांनी मी शेतात जेवणार आहे, डबा पाठवून द्या हे सांगितलं. तसंच घरी आल्यावर दूध घेईन असंही त्याने त्याच्या मुलाला सांगितलं. यानंतर मोठ्या मुलाने डबा भरला आणि लहान भावाच्या हातात दिला आणि सांगितलं की वडिलांना हा डबा नेऊन दे.

शेतात वडिलांना डबा देण्यासाठी गेलेला हा मुलगा रात्री १.३०-२ च्या सुमारास घरी आला. दरवाजा ठोठावून आईला घडलेला प्रकार सांगितला. त्याने आईला सांगितलं की ज्यावेळी मी शेतात डबा घेऊन वडिलांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला आणि तुला चारित्र्यावरुन बडबडायला सुरुवात केली. मला शिवीगाळ आणि मारहाण केली. मी त्यांना खूप समजवलं पण त्यांनी माझं काहीच ऐकून घेतली नाही. शेवटी तिथे पत्र्याच्या शेडमध्ये जी कुऱ्हाड होत त्याने मी त्यांच्यावर वार केले.

अल्पवयीन मुलाने हे सांगताच या दोघेही भाऊ शेतात गेले. वडील जखमी अवस्थेत पडले होते. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होत होता. त्यानंतर या माणसाच्या मोठ्या मुलाने काकांना फोन केला. यानंतर काकांनी घटना स्थळी पोहचून या माणासला रुग्णालयात दाखले केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणात माहिती मिळाल्यानंतर सरपंचांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला. पाच तासांमध्ये अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. मुंबई तकने हे वृत्त दिलं आहे.