सावंतवाडी: कुडाळ तालुक्यातील घावनळे येथून दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेम प्रकरणातून गळा दाबून खून झाल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. या मुलीचा मृतदेह काल, मंगळवारी रात्री वाडोस-बाटमाचा चाळा येथील एका बंद घरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी कुणाल कृष्णा कुंभार (रा. गोठोस-मांडशेतवाडी) याला ताब्यात घेतले आहे. कुणालनेच मुलीला बोलावून तिचा खून केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी २ ऑगस्ट २०२५ पासून घावनळे गावातून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. एक महिना उलटूनही तिचा शोध लागत नव्हता, त्यामुळे स्थानिक पातळीवर विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले होते. पोलीस आणि नातेवाईक तिचा मित्र-मैत्रिणी, बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि मुंबई अशा अनेक ठिकाणी शोध घेत होते.
प्रेमसंबंधास नकार, म्हणून संपवले
तपासादरम्यान, पोलिसांना मुलीचे कुणाल कृष्णा कुंभार याच्याशी प्रेमसंबंध होते, मात्र ती त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत नव्हती, फक्त मैत्री ठेवत होती, अशी माहिती मिळाली. त्यामुळे चिडून कुणालने तिला संपवण्याचा विचार केला. २ ऑगस्ट रोजी कॉलेजमधून ती आंबेरी तिठा येथे आली. तेथून कुणाल तिला मोटरसायकलवरून वाडोस-बाटमाचा चाळा येथील एका निर्जन स्थळी असलेल्या बंद घराजवळ घेऊन गेला. तिथे त्याने गळा आवळून तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह घराच्या खिडकीतून आत टाकला आणि नंतर तो स्वतः खिडकीतून आत जाऊन मृतदेह नीट झाकून ठेवला.
मुलीच्या मोबाईलचे सीडीआर तपासले असता, तिच्या फोनवर शेवटचा कॉल कुणालचा असल्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी कुणालला अनेकदा चौकशीसाठी बोलावले, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेरीस, पोलिसांनी खाक्या दाखवताच कुणालने आपला गुन्हा कबूल केला आणि आपणच गळा आवळून खून केल्याचे सांगितले.
कुणालने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, अत्यंत निर्जनस्थळी असलेल्या बंद घरात मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेहावरील कपड्यांवरून मुलीच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटवली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी काल मंगळवारी सायंकाळी कुणाल कुंभार याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.