पिंपळगाव बसवंत येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौघांना  रविवारी निफाड न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यात हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश असून अन्य चार जण फरार आहेत.
गुरुवारी रात्री ही मुलगी घरी येत असताना तिचा मित्र रोहित ऊर्फ किरण पाटील याने तिला चिंचखेड चौफुली येथे गाठले. आणि तिला मोटारसायकलवरून एका इमारतीतील फ्लॅटमध्ये नेले. या ठिकाणी उमेश चव्हाण (रा. देवगाव, ता. निफाड), केतन सोनवणे, सागर आवारे (रा. पिंपळगाव) हे किरणचे मित्र होते. या मुलीला बदनामीची धमकी देऊन त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी बंटी पानकर, जय सोनवणे, अमोल वराडे (रा. नाशिक) यांनीही तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी रात्री किरणचा मित्र नितीन चव्हाण यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर किरणने याबाबत घरी कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी देऊ तिला घरी सोडले. शनिवारी या मुलीने पालकांना सर्व हकीकत सांगितली. या प्रकरणी पालकांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून या प्रकरणी किरण पाटील, उमेश चव्हाण, केतन सोनवणे व सागर आवारे यांना शनिवारी अटक केली. रविवारी त्यांना प्रथम पिंपळगाव न्यायालयात व त्यानंतर निफाड न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. केतन व उमेश हे हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेत आहेत.