सांगली : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांची अनुकूलता मिळविण्यासाठी आलेल्या संवाददूत पथकाला तीव्र विरोधामुळे चर्चेविनाच परतावे लागण्याची घटना कवलापूर (ता. मिरज) येथे शनिवारी घडली. महसूल, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व मोनार्क प्रकल्पाचे प्रतिनिधी यांचे पथक आज चर्चेसाठी आले होते.
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध मोडून काढण्यासाठी आणि बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी शासनाने संवाददूत हे पथक स्थापन केले आहे. या पथकामध्ये महसूल अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व मोनार्क कंपनीचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. आज या पथकाने ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह कवलापूर येथील सिध्देश्वर मंदिरात बैठक आयोजित केली होती.
सिध्देश्वर मंदिरात संवाददूत पथक आल्यानंतर जमलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी जमीन मूल्यांकनाबाबत माहिती देण्यासाठी आपण आलो असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित शेतकऱ्यांनी केवळ शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबतच चर्चा होऊ शकते, अन्य बाबी आम्हाला ऐकायच्याच नाहीत असे सांगत पथकाला निरुत्तर केले. शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीत बाधित शेतकऱ्यांनी या महामार्गालाच विरोध करत मोबदला देण्याचा मुद्दाच उपस्थित होत नसल्याचे सांगत गावातून परत फिरा असे बजावले. पथकाचे काहीच ऐकू न घेता जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत या पथकाला चर्चेपासून वंचित ठेवले. कोणत्याही स्थितीत आमची जमीन या प्रकल्पासाठी देणार नाही, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला तर एकाही अधिकाऱ्याला रानात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका यावेळी नियोजित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मांडली.
यावेळी शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे दिगंबर कांबळे, भूषण गुरव, घनशाम नलवडे, शरद पवार, आनंदा मोरे, सुनील पवळ, विष्णू सावंत, नंदकुमार माळी आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन संवाददूत पथकाने गावातून काढता पाय घेतला. असाच प्रकार शुक्रवारी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे घडला.