सांगली : अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झालेल्या मिरजेतील कर्मवीर चौकातील अतिक्रमणाविरुद्ध महापालिकेने सोमवारी मोहीम हाती घेऊन १८ शेड हटवले, तर पाच हातगाडे जागेवर तोडण्यात आले. तसेच १५ हातगाड्या हलविण्यात आल्या. आयुक्त सत्यम गांधी यांनी जागेवर उभे राहून अतिक्रमण विभागाकडून ही मोहीम राबवली.
मिरज शहरात कर्मवीर चौकापासून महात्मा बसवेश्वर उद्यानाच्या पूर्व बाजूला मोठ्या प्रमाणात अस्थायी शेड उभारून हॉटेल, चहाविक्रीची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच काही ठिकाणी वाहनांवर व्यवस्था करून नाष्टा केंद्रेही सुरू करण्यात आली होती. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढण्यास कोणी विक्रेते इच्छुक नव्हते. त्यामुळे महापालिकेने आज धडक कारवाई हाती घेऊन हा रस्ता रहदारीस खुला केला.
सांगलीतील जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर महापालिका प्रशासनाने आज मोर्चा मिरज शहरातील अतिक्रमणाकडे वळवला. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व अतिक्रमण निर्मूलन पथकाने आयुक्त गांधी यांच्या समोर येथील अतिक्रमणे बाजूला केली. अतिक्रमण केलेल्यांना साहित्य हलविण्यास अवधी देण्यात आला होता. ज्यांनी या अवधीत साहित्य हलवले नाही, त्यांचे साहित्य महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या मदतीने दूर करत रस्ता रहदारीस खुला केला. या वेळी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, विजया यादव, सहायक आयुक्त अनिस मुल्ला उपस्थित होते.