समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा प्रकार घडल्यामुळे शुक्रवारपासून उत्तर प्रदेशमध्ये मोठा गदारोळ सुरू आहे. सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या भाजपा सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. सोशल मीडियावर देखील यासंदर्भात नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “ज्याला लोक “रामराज्य” समजतात ते खरं तर “रामभरोसे” राज्य आहे. रामभरोसे राज्यात असलेल्या आंधळ्या सरकारमुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. सीतेची ही हतबलता तिथे रोजचीच आहे.”

उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज

बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी देखील ट्विटरवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. “उत्तर प्रदेशमध्ये राक्षसराज आहे. कोणत्या तोंडानं ते स्वत:ला बाबा आणि योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस आहे. पोलिसाच्या वेषात इथे गुंड कायद्याचं रक्षण करत आहेत”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

भाजपा सरकारमध्ये कायदा नाही तर जंगलराज

माजी मुख्यमंत्री मायावती यांनी देखील योगी सरकारवर हल्लाबोल केला. मायावती म्हणाल्या की, “उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारमध्ये कायदा नाही तर जंगलराज सुरु आहे. लखीमपुर खेरी येथील महिलेशी केलेले गैरवर्तन अत्यंत लज्जास्पद आहे.”

हेही वाचा- केंद्रीय मंत्रीमंडळातील २४ मंत्र्यांविरोधात दाखल आहेत गंभीर गुन्हे; ADR चा अहवाल जाहीर!

नेमकं काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशमध्ये सध्या स्थानिक निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांसाठी लखीमपुर खीरीच्या पसगवा ब्लॉकमध्ये समाजवादी पक्षाच्या एक महिला उमेदवाराची प्रस्तावक म्हणून एक महिला कार्यकर्ती शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, तिथे असलेल्या विरोधी उमेदवारांशी त्यांचा वाद झाला. यादरम्यान संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं, तसेच त्यांची साडी खेचण्याचा प्रयत्न प्रयत्न केल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून केला जात आहे. या संदर्भातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच, उत्तर प्रदेश काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या महिलेचा एक व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे. यामध्ये सदर मगिला घडलेला प्रकार सांगत आहे.