मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा काल औरंगाबादमध्ये पार पडली. या सभेतून मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष भाजपावर जोरदार टीका केली. शिवाय, हिंदुत्वाच्या मुद्य्यावरूनही उद्धव ठाकरेंनी सुनावले. यावेळी त्यांनी भाजपाचे औरंगाबादमधील आमदार अतुल सावे यांचे वडील दिवंगत खासदार मोरेश्वर सावे हे औरंगाबादहून अयोध्येला शिवसैनिकांसह गेले होते याची आठवण करून दिली आणि आमदार अतुल सावेंनी हे फडणवीसांना सांगावे, असे म्हटले. यावर आज भाजपा आमदार अतुल सावे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती होती.
आमदार अतुल सावे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी काल माझे वडील मोरेश्वर सावे यांचा उल्लेख केला. अतिशय दु:खद बाब आहे, की माझे वडील मोरेश्वर सावे कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते, पण अयोध्येला जाऊन आल्यावर जे प्रखर हिंदुत्व मांडत होते, हे शिवसेनेमधील नेत्यांना आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी त्यांचं खच्चीकरण केलं. त्यांना साधं लोकसभेचं तिकीटही दिलं नाही.”
काल मुख्यमंत्र्यांनी पूर्ण स्टोरी का सांगितली नाही? –
तसेच, “काल मुख्यमंत्र्यांनी अर्धीच स्टोरी सांगितली, पूर्ण स्टोरी का सांगितली नाही?, माझा त्यांना प्रश्न आहे हा, की जर तुम्हाला एवढा अभिमान होता तर त्यांना लोकसभेचं तिकीट का दिलं नाही? लोकांनी त्यांना जी धर्मवीर पदवी दिली होती, ती का नाही मान्य केली. उलट तुम्ही त्यांचं खच्चीकरण केलं आणि त्यांना लोकसभेचं तिकीटही दिलं नाही. त्यामुळे माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हा उलट प्रश्न आहे.” असं यावेळी अतुल सावे म्हणाले.
याचबरोबर, “कारसेवक म्हणून संभाजीनगरहून(औरंगाबाद) एक रेल्वे भरून लोक गेले होते, त्यामध्ये माझे वडील गेले होते. त्यामध्ये शिवसेना असा काही विषय नव्हता. त्यावेळस प्रखर हिंदुत्व मानणारे सर्व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना, भाजपा सर्व हिंदुत्वादी संघटनेचे लोक त्या रेल्वेत संभाजीनगरहून अयोध्येला गेले होते.” असंही यावेळी आमदार अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते? –
“हिंदुत्वाच्याच मुद्य्यावर आमदार झाले आहेत, मग त्या आमदारांना सांगा की तू ज्यांची पालखी वाहतोय त्या फडणवीसांना सांग तुझी वडील तिकडे गेले होते का नव्हते? खरं खोटं काय ते होऊन जाऊद्या, एक तर गेले नव्हते तर तसं सांगा माझे वडील तिकडे गेले नव्हते, त्यांनी उगाचच खोटं सांगितलं आणि जर गेले असतील तर ठामपणे फडणवीसांना सांगा, तुम्ही कुठं होता माहीत नाही, पण माझे वडील तिकडे गेले होत तमाम शिवसैनिक तिकडे गेले होते.”
मोरेश्वर सावे यांची राजकीय कारकीर्द –
औरंगाबादसह मराठवाडय़ात शिवसेनेच्या जडणघडणीत पहिल्या कालखंडात बिनीचे शिलेदार अशी ओळख असणारे माजी खासदार मोरेश्वर दीनानाथ सावे यांची १९८८ ते १९९६ अशी राजकीय कारकीर्द खळबळजनक होती. शिवसेनेच्या वाढीत त्यांचा मोठा सहभाग होता. बाबरी मशीद प्रकरणातही ते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत सहआरोपी होते. ‘मशाल’ या चिन्हावर पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढविणारे मोरेश्वर सावे नंतर शिवसेनेत गेले. राजकारणातील चढउतार पाहात औरंगाबादचे ते महापौरही झाले. १९८९-९० अशी त्यांची महापौरपदाची कारकीर्द होती. यानंतर १९८९ ते १९९६ या कालावधीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातही त्यांनी भूमिगत राहून काम केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे मोरेश्वर सावे नंतरच्या काळात शिवसेनेलाही अप्रिय झाल्याचे दिसून आले होते.शिस्तीचा कडवा शिवसैनिक अशी त्यांची अनेक वर्षे ओळख होती.
