प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांचा ११ जानेवारीला अपघात झाला होता. भरघाव वाहनाने बच्चू कडू यांना धडक दिली होती. या अपघातात बच्चू कडूंच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर, अपघातामागे घातपाताची शक्यता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी व्यक्त केली होती. यावर आता बच्चू कडूंनी स्पष्टीकरण देत घातपाताची शक्यता वर्तवणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“घातपाताच्या चर्चेला काही अर्थ नसून, मीच घाईत होतो. वाहन चालकाचीही काही चूक नाही. माझ्यामुळे चालकाचा गोंधळ झाला आणि धडक झाली. वाहन चालकाने वाचवण्याचा प्रयत्न केला होता. अपघात झालेल्याने त्यावर बोललं तर ठिक आहे. मात्र, बाकींचे लोक यावर राजकारण करत असतील, त्याची काही मर्यादा असते. मेल तरी राजकारण, जन्माला आलं तरी राजकारण, अपघात झाला तरी राजकारण करतात. मला न विचारता घातपाताची शक्यता वर्तवली, हे ठिक नाही,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “…तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अंत होणार”, प्रकाश आंबेडकरांचं विधान; म्हणाले…
अमोल मिटकरी काय म्हणाले होते?
“आमचे राजकीय मतभेद असतील, त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष वेगळ असेल. पण, अकोला जिल्ह्याचं पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यातील दिव्यांगासाठी केलेलं काम मी पाहिलं आहे. असा व्यक्ती सातत्याने सरकारमध्ये असतानाही सरकारच्या विरोधात बोलतो. त्या व्यक्तीला एखादा दुचाकीस्वार येऊन उडवतो अन् गंभीर दुखापत करतो. मला वाटतं काहीतरी काळंबेरं आहे,” अशी शंका अमोल मिटकरींनी व्यक्त केली होती. तसेच, “घडलेल्या घटनेची पूर्णपण चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणीही मिटकरींनी केली होती.