सांगली : गरिबावर जोर-जबरदस्ती, जुलूम करण्याची व्यवस्था निर्माण झाली असली, तरी नीतिमत्ता, नैतिक मूल्ये आपल्याकडे असल्याने जनतेची साथ मिळेल, या जोरावर आपण संघर्ष करत राहू, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा मेळावा सांगलीत पार पडला.
या मेळाव्यात आ. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मेळाव्यास आमदार अरुण लाड, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हा बँकेच्या संचालिका अनिता सगरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मेळाव्यात युवक जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
या वेळी आ. पाटील म्हणाले, विधिमंडळात प्रश्नांची सोडवणूक होताना दिसत नाही. आपल्या भागात द्राक्ष, डाळिंब शेती अतिवृष्टीने नासली. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही. तरी कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी संबोधतात. मग शब्द मागे घेत सरकारला भिकारी संबोधले, ते खरेच आहे का? सरकारने शिक्षकांचे अनुदान रखडवले.
कंत्राटदारांचे पैसे दिलेले नाहीत. बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. सर्वसामान्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. कोणीही मागणी न केलेला ८६ हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग लोकांवर लादला जात आहे. ठरावीक लोकांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेतून पैसे काढण्याचा मार्ग शोधला आहे. सरकारवर ९.५ लाख कोटींचे कर्ज आहे.
या वेळी बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा उपाध्याक्ष मनोज शिंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, संगीता हारगे, ताजुद्दीन तांबोळी, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, आजी-माजी लोकप्रतिनिधींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.