Sadabhau Khot : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप झालं. मात्र, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात यावेळी अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. छगन भुजबळ यांनी तर आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांनीही मत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता सदाभाऊ खोत यांनी आपल्याला मंत्रि‍पदाची काही अपेक्षा नव्हती, असं विधान केलं आहे. तसेच मंत्रि‍पदाची अपेक्षा का नव्हती यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

सदाभाऊ खोत काय म्हणाले?

मंत्रिपद मिळाल्यानंतर नेते दिल्लीला येतात. मात्र, तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही तरी तुम्ही दिल्लीला आलात? असं आमदार सदाभाऊ खोत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता सदाभाऊ खोत म्हणाले, “आम्ही दोघेही (गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत) चळवळीतून पुढे आलेलो कार्यकर्ते आहोत. आम्हाला पदे मिळतील किंवा नाही या भावनेतून आम्ही कधीही काम केलं नाही आणि करतही नाहीत. आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत लढत इथपर्यंत आलो आहोत. आमची विस्थापितांची लढाई आहे. त्यामुळे आमच्या मंत्रि‍पदाबाब अशा काही अपेक्षा मनात नव्हत्या”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘…म्हणून आम्ही फडणवीसांच्या मागे उभा राहिलो’

“आम्ही देवाभाऊ (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) यांच्या पाठिमागे उभा राहिलो यामागे कारण होतं की, देवेंद्र फडणवीस हे विस्थापितांची लढाई प्रस्थापितांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना त्या पदावर जाईपर्यंत आमचं काम होतं की जसं एखाद्या लढाईत राजा सिंहासनापर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत सैनिक हातातील तलवार टाकत नाहीत, तसं आम्ही मैदानात लढत राहिलो. देवेंद्र फडणवीस हे राजकारणात आले याचं कारण म्हणजे त्यांना गावगाडा उभा करायचा आहे. महाराष्ट्र विकसित करायचा आहे. अशा पद्धतीची भावना ठेऊन देवेंद्र फडणवीस राजकारणात काम करत आहेत”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.