भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनाबाबत ( ठाकरे गट ) मोठा दावा केला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ठाकरे गटातील उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार आहेत, असा दावा नितेश राणेंनी केला आहे. नितेश राणेंच्या दाव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे काय म्हणाले? "एका वर्षात उद्धव ठाकरे यांना नव्याने पक्ष उभा करणं शक्य नाही. मुळात तो त्यांचा पिंड नाही. आगामी निवडणुकीत पक्षचिन्हदेखील मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, आमदार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार, अशी खात्रीलायक माहिती आहे," असं राणेंनी सांगितलं. हेही वाचा : “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा "उद्धव ठाकरेंनी अनेक आमदार तयार केले आहेत" यावर वैभव नाईक म्हणाले की, "नितेश राणेंनी आपला पक्ष किती दिवसांत विलीन केला, याचा इतिहास पाहिला पाहिजे. ईडीच्या भितीने काँग्रेसमधून बाहेर पडत स्वत:चा पक्ष स्थापन केला. पण, स्वत:च्या पक्षाचा एक आमदार निवडून आणू शकले नाहीत. ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर बोलत आहे. उद्धव ठाकरेंनी अनेक आमदार तयार केले आहेत. हे आमदार गेले, तरी दुसरी फळी तयार झाली आहे. पक्ष, आमदार, खासदार गेले तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकप्रियता वाढत आहे." हेही वाचा : “प्रकाश आंबेडकरांनी इकडं तिकडं फिरू नये, मी तुम्हाला…”, रामदास आठवलेंनी दिली ऑफर "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकप्रियता." "त्यामुळे नितेश राणेंनी आमच्या आमदारांची आणि पक्षाची चिंता करू नये. आपलं भाजपातील स्थान आणि मंत्रीपद कसे मिळेल, याची चिंता करावी. आमचं चिन्ह, नाव गेलं तरीही पक्ष दुपटीने वाढत आहे. राणेंनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर निवडणूक लावावी. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकप्रियता किती आहे, हे निश्चित कळेल," असं आव्हानही वैभव नाईक यांनी नितेश राणेंना दिलं आहे.