Raj Thackeray Speech in Mumbai Morcha: महाराष्ट्रात ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगही कामाला लागला आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा उपस्थित केला आहे. हे घोळ संपल्यानंतरच निवडणुका घ्या, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. याच मागणीसाठी आज मुंबईत महाविका आघाडीसह सर्व विरोधी पक्षांनी ‘सत्याचा मोर्चा’ काढला. या मोर्चामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सहभागी झाले होते. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात खळ्ळखट्याक् करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.
मतदार याद्यांमधील घोळावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल
फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महानगर पालिका भवनापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा संपल्यानंतर झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मतदार याद्यांमधील गोंधळावरून निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले. “आम्ही बोलतोय, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार बोलतायत की याद्यांमध्ये दुबार मतदार आहेत. शेतकरी कामगार पक्षही बोलतोय, कम्युनिस्ट पक्षाचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत. एवढंच नाही, भाजपाचेही लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत. शिंदेंचे, अजित पवारांचेही लोक बोलतायत. अरे मग अडवलं कुणी? मग हे निवडणूक घेण्याची घाई का करत आहेत? साधी गोष्ट आहे. मतदारयाद्या साफ करा. त्यानंतर जेव्हा निवडणुका होती, त्यात यश-अपयश सगळ्या गोष्टी मान्य असतील”, असं राज ठाकरे म्हणाले.
“हे दुबार-तिबारवाले दिसले तर…”
दरम्यान, येत्या निवडणुकांमध्ये जर दुबार मतदार दिसला, तर तिथल्या तिथे बडवून काढा, असं आवाहन राज ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं. “जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा याद्यांवर तुम्ही सगळे काम करा. चेहरे कळले पाहिजेत. जर त्यानंतर हे दुबार-तिबारवाले आले, तर तिथेच फोडून काढायचे. बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत”, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी सादर केले पुरावे
मतदार याद्यांमध्ये अनेक बनावट मतदार, दुबार मतदान करणारे मतदार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. खुद्द लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापासून आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांनीही वारंवार यासंदर्भात विविध प्रकारची कागदपत्रे दाखवून दावे केले आहेत. त्यानंतरही सत्ताधाऱ्यांकडून पुराव्यांची मागणी केली जात आहे. त्यावर राज ठाकरंनी आपल्या भाषणात चक्क गठ्ठ्यांचा एक ढीगच पुराव्यादाखल दाखवला. हे सगळे दुबार मतदार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. काही मतदारसंघांची यादीही यावेळी राज ठाकरेंनी वाचून दाखवली.
राज ठाकरेंनी वाचून दाखवली दुबार मतदारांची यादी
| मतदारसंघ | एकूण मतदार | दुबार मतदार |
| मुंबई उत्तर | १७ लाख २९ हजार ४५६ | ६२ हजार ३७० |
| मुंबई उत्तर-पश्चिम | १६ लाख ७४ हजार ८६१ | ६० हजार २३१ |
| मुंबई उत्तर-पूर्व | १५ लाख ९० हजार ७१० | ९२ हजार ९८३ |
| मुंबई उत्तर-मध्य | १६ लाख ८१ हजार ०४८ | ६३ हजार ७४० |
| मुंबई दक्षिण-मध्य | १४ लाख ३७ हजार ७७६ | ५० हजार ५६५ |
| मुंबई दक्षिण | १५ लाख १५ हजार ९९३ | ५५ हजार २०५ |
| नाशिक | १९ लाख ३४ हजार ३४९ | ९९ हजार ६७३ |
| मावळ | १९ लाख ८५ हजार १७२ | १ लाख ४५ हजार ६३६ |
| पुणे | १७ लाख १२ हजार २४२ | १ लाख २ हजार ०२ |
| ठाणे | – | २ लाख ९ हजार ९८१ |
“एवढे पुरावे देऊनही हट्ट चालू आहे की कोर्टानं निवडणुका घ्यायला सांगितल्या आहेत. कशाला? कुणाला घाई आहे? ५ वर्षं निवडणुका झाल्या नाहीत, आणखी एक वर्षं नाही झाल्या तर काय फरक पडणार आहे? पण जे लोक आत भरले आहेत त्यांचं काय करायचं? त्यामुळे त्यातल्या त्यात निवडणुका घेऊन यश मिळवायचं चाललंय. याला काय निवडणुका म्हणतात?” असा सवालही राज ठाकरेंनी केला.
“एक आमदार सांगतो की मी बाहेरून २० हजार मतं आणली. काहीही चालू आहे. नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेलेत. कुणीतरी सुलभ शौचालयात नोंदणी केली. कुठेही बसलेला दिसला की नोंदवायचं का? ही लाजिरवाणी गोष्ट देशभरात चालू आहे. मी २०१७ पासून सांगतोय की यात गडबड आहे. यंदाच्या निवडणुकीत निवडून आलेले लोकही स्वत:ला चिमटा काढून बघत होते की मी कसा निवडून आलो. पण निवडून येण्याची सोय आधीच झाली होती. त्यालाही माहिती नव्हतं की तो निवडून येणार. हे सगळं निवडणूक आयोगामार्फत चालू आहे. कशा निवडणुका लढवायच्या सांगा. उन्हातान्हात रांगेत उभ्या राहणाऱ्या मतदाराचा अपमान नाही का हा? मॅच आधीच फिक्स्ड आहे. त्याच्या मताला काय किंमत आहे?” असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थितांना केला.
