आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी पक्षबांधणी तसेच निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सर्वपक्षीय नेते आपापले पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी बातचीत करत करत असून या निवडणुकांसाठी योजना आखत आहेत. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील कंबर कसली असून ते सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर, अमरावतीतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सविस्तर चर्चा करतील. आजपासून (१८ सप्टेंबर) त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून सध्या ते नागपूरमध्ये आहेत.

हेही वाचा >> ‘पुढचा नंबर आमचा तर नाही ना?’, यवतमाळ-अमरावतीमधील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांचं गडकरींना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आजपासून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे सध्या नागपूरमध्ये पोहोचले आहेत. येथे ते दिवसभर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. काल (१७ सप्टेंबर) ते विदर्भ एक्स्प्रेस रेल्वेने नागपूरसाठी रवाना झाले होते. सकाळी आठ वाजता ते नागपूमध्ये पोहोचले आहेत.

हेही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅमेरा लेन्सवरील कव्हर न काढताच करत होते फोटोशूट? TMC नेत्याने शेअर केला फोटो, भाजपाचं प्रत्युत्तर

कसे असेल राज ठाकरेंचे मिशन विदर्भ?

विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकांच्या माध्यमातून संवाद साधतील. ते आज म्हणजेच १८ सप्टेंबर रोजी नागपूरमध्ये ६ शहरी आणि ६ ग्रामीण विधानसभा विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. १९ सप्टेंबर रोजी ते चंद्रपूरला पोहोचतील. चंद्रपूरमध्ये दाखल झाल्यानंतर ते येथील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. २० आणि २१ सप्टेंबर रोजी ते अमरावती जिल्ह्यात असतील. येथेही ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीच्या माध्यमातून चर्चा करतील. शेवटी हा दौरा संपल्यानंतर ते २२ सप्टेंबर रोजी मुंबईला परततील.