पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. “माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच भारताचं हित आहे,” असं राज यांनी म्हटलं आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. राज यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक पोस्ट केली आहे.

नक्की वाचा >> पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे: भातखळकरांचा पवार, ठाकरेंवर निशाणा; शिवसैनिक म्हणाले, “केंद्रात, राज्यात, पुण्यात…”

“एएनआयने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचलं पाहिजे” असं राज यांनी पोस्टच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”

“ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे या गंभीर आरोपांखाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही या देशद्रोह्यांचं समर्थक करत जर या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेर आमच्या देशात चालणार नाहीत,” असा इशाराही राज यांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना दिला आहे.

“माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही” असंही राज यांनी म्हटलं आहे.

“नाहीतर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. भारतातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहाट्यांच्या मुठी जर आवळल्या तर या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल” असं सूचक विधान राज यांनी केलं आहे. “त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच भारताचं हित आहे,” असं पत्राच्या शेवटी राज यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात एनआयएने केलेल्या कारवाईला विरोध करण्यासाठी शुक्रवारी आंदोलनाची तयारी केली होती. मात्र या आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर इथे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यावेळीच या आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी केली. पोलीस काही कार्यकर्त्यांना गाडीमध्ये बसवून घेऊन जात असतानाच रस्त्यावर जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या नावाने घोषणाबाजी केली. आंदोलकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली. ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणाही या आंदोलकांनी दिल्या.