बाळासाहेब ठाकरे हे कसे कडवट मराठी होते. त्यांच्या मनाने तो कसा ध्यास घेतला होता? याचा अनुभव मी घेतला आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केलं. एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच मी राजकारणात तरू शकलो, नवा पक्ष काढू शकलो असंही ते म्हणाले. त्यांच्या भाषणात त्यांनी भाजपा आणि शिवसेनेची युती असताना सरकार स्थापनेची वेळ आली होती तेव्हा काय झालं तो किस्सा सांगितला.


विधान भवनात काय होता कार्यक्रम?

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण मुंबईतल्या विधानभवनात करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळ्याच मान्यवरांची हजेरी होती. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मात्र आलेले नव्हते. राज ठाकरे यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. राज ठाकरेंनी खुमासदार किस्से सांगत बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या.

राज ठाकरे यांनी काय सांगितला किस्सा?

बाळासाहेब ठाकरे बाहेर वेगळे आणि आतमध्ये वेगळे असे कधीच नव्हते. एक उदाहरण तुम्हाला देतो. १९९९ मध्ये नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हाची विधानसभेची निवडणूक झाली. गोपीनाथ मुंडेही त्यावेळी होते. काही कारणास्तव शिवसेना आणि भाजपाची युती मुख्यमंत्रीपदावर अडत होती. काही गोष्टी जुळून येत नव्हत्या. आमदार खेचणं सुरू होतं. पण काही जमत नव्हतं. एके दिवशी दुपारची वेळ मातोश्रीवर मी बसलो होतो. त्यावेळी कार्सचे आवाज आले. दोन कार आल्या. त्यातून प्रकाश जावडेकर आणि अजून एक दोन चार जणं आले. मला म्हणाले राज आम्हाला बाळासाहेबांना भेटायचं आहे. मी म्हटलं ते झोपले आहेत. आता त्यांची झोपायची वेळ आहे. मला जावडेकर म्हणाले अर्जंट आहे आज आपलं सरकार बसतं आहे. मी त्यांना सांगितलं आत्ता ते भेटणार नाहीत. जावडेकर म्हणाले एक निरोप तरी द्या. मी म्हटलं निरोप देतो. त्यांनी मला सांगितलं की सुरेश जैन हे युतीचे मुख्यमंत्री असतील. ते आमदार खेचून आणतील आपलं सरकार बसतंय. हे बाळासाहेबांच्या कानावर घालायचं आहे.

बाळासाहेबांना हाक मारली आणि..

प्रकाश जावडेकरांचा निरोप घेऊन मी बाळासाहेबांकडे गेलो. ते झोपले होते. आम्ही अरे तुरे मध्ये बोलायचो. मी म्हटलं काका उठ.. तर मला उठून म्हणाले काय झालं? मी त्यांना सांगितलं की खाली जावडेकर वगैरे मंडळी आलेली आहेत ते म्हणत आहेत आपलं सरकार बसतंय. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं आहे. बाकी आमदार ते खेचून णतील. संध्याकाळी सरकार बसेल मी त्यांना हा निरोप दिला. माझ्याकडे बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं आणि म्हणाले त्यांना सगळ्यांना जाऊन सांग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मराठीच माणूस बसेल दुसरं कुणी बसणार नाही. मला हे वाक्य म्हणाले ते आणि झोपी गेले. मला त्या क्षणी कळलं की ते किती कडवट मराठी होते. त्यांनी त्यासाठी सत्तेवर लाथ मारली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी बाळासाहेबांचे संस्कार वेचत गेलो

एक घरातली व्यक्ती, एक शिवसेना प्रमुख म्हणून एक व्यक्ती, व्यंगचित्रकार म्हणून एक व्यक्ती अशी विविधं अंग मी पाहिली. वारसा हा वास्तूचा नसतो तो विचारांचा असतो. मी काही जपलं असेल तर विचारांचा वारसा जपला आहे. मला आज विनोद म्हणून काही गोष्टी इथे सांगता येणार नाहीत. मात्र बाळासाहेब ठाकरे जेवढे कडवट होते तेवढेच मुलायमही होते. संस्कार कुणी करत नसतं. संस्कार वेचायचे असतात जे मी वेचत गेलो असंही राज ठाकरे म्हणाले.