मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांनी काम पाहून मतदान केलं पाहिजे असं आवाहन करताना भावनांच्या आहारी जाऊन मतदान करणार नाही हे लोकांनीच दाखवून द्यायचं असतं असं मत व्यक्त केलं आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “लोकांना सत्तेत आहेत त्यांच्याकडून अपेक्षा नाही, पण आमच्याकडून अपेक्षा आहेत. गेल्या १४ वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोक कुठे जातात कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे?,” असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरेंनी म्हटलं की, “अनेकदा मला लोकांचंही कळत नाही. काम पाहून मतदान करतात की नाहीत हा प्रश्नच आहे. काम पाहून मतदान होणार नसेल तर विषयच संपला. जितकी आंदोलनं मनसेने गेल्या १० वर्षात केली तितकी कोणीच केली नाहीत. आपण लोकांना निकालही दाखवून दिले. रेल्वे स्थानकांच्या बाहेरचे फुटपाथ मोकळे झाले. पण मतदान करायच्या वेळी सगळं कुठे जातं कळत नाही”. आपली खंत व्यक्त करताना अशावेळी अपेक्षा घेऊन करायचं काय ? अशी विचारणा त्यांनी केली. पण आपण महाराष्ट्राला बांधील आहोत असंही यावेळी ते म्हणाले.

आणखी वाचा- वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना – राज ठाकरे

पक्षाच्या वाटचालीवर बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं की, “१४ वर्ष झाली, प्रवास सुरु आहे. यावेळी माध्यमांनी प्रेम दिलं, बोचरी टीका केली पण हे चालायचंच. काही सुधरत नाही आहेत त्यांचा विचार न केलेला बरा. १४ वर्षाच्या काळात पक्षाचे १३ आमदार निवडून आले, अनेक नगरसेवक निवडून आले. तरीही उलट आम्हालाच तुमचे आमदार निवडून नाही आले असं सारखं विचारलं जातं”. यावेळी राज ठाकरेंनी काँग्रेसचं उदाहरण देत सांगितलं की, काँग्रेसची केंद्रात सत्तेत होती. आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. इतकी वर्ष राज्य केलेल्या पक्षाची अशी स्थिती होते. जेव्हा देशात लाट असते तेव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? लाटा येतात तेव्हा अनेक पक्षांना त्याचे धक्के बसतात. अनेक राज्यांमध्ये भाजपालाही धक्के बसत आहेत”.

VIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण येथे पाहा

विधानसभा निवडणुकीमध्ये राज यांच्या मनसेने १०० हून अधिक जागा लढवल्या. मात्र त्यापैकी केवळ एकाच जागेवर मनसेला विजय मिळवता आला. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेच्या राजू पाटील यांनी अटीतटीच्या लढाईत बाजी मारली. शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा पराभव करत राजू जिंकून आले. २००९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यभरातून मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. पहिल्या आठ वर्षांत मनसेला चांगले यश मिळाल्याचे चित्र दिसले. २००६ साली पक्ष स्थापन झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या पहिल्या निडणुकीत सात नगरसेवक विजयी झाले, तर दुसऱ्या पालिका निवडणुकीत सातचे सत्तावीस नगरसेवक झाले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये सातही नगरसेवक मनसेचे विजयी होण्याचा चमत्कार राज यांनी घडवून आणला होता. एवढेच नव्हे तर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ११ जागा लढवून तब्बल १५ लाखांहून अधिक मते मिळवली. विधानसभा निवडणुकीत १४३ जागा लढवताना मनसेचे १३ आमदार विजयी झाले, तर त्यांना पंचवीस लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. मात्र मागील काही वर्षांपासून स्थानिक निवडणुका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. त्याचेच शल्य राज यांनी आज आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns foundation day anniversary raj thackeray on voters navi mumbai sgy
First published on: 09-03-2020 at 14:39 IST