मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसी येथील सभा वादळी ठरली. या सभेत ठाकरे यांनी केंद्र सरकार तसेच राज्यातील भाजप नेत्यांवर टीकेचे आसूड ओढले. सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे चर्चेत असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी चांगलीच टीका केली. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाचा दाखल देत उद्धव ठाकरे यांनी राज यांना गेलेली केस म्हटलं. उद्धव ठाकरेंच्या याच टीकेनंतर आता मनसे नेते आक्रमक झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना हिंदूजननायक म्हणत त्यांचा गौरव केला आहे.

हेही वाचा >>> Uddhav Thackeray BKC Rally : “…तर महाराष्ट्र असा पेटेल, की तुम्हाला पळता भुई थोडी होईल”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपाला खुलं आव्हान!

“शिवाजी पार्क सभेचा अनभिषिक्त सम्राट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तर हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे आहेत. बाकी सगळे….जय हिंद जय महाराष्ट्र” असे खोचक ट्विट बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर केले. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाय.

हेही वाचा >>> ‘ही तर केमिकल लोचाची केस…’ नाव न घेता उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना कोपरखळी

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना संबोधूनत तिखट भाषण केले. या भाषणात त्यांनी इंधन दरवाढ, राम मंदिर, महागाई या मुद्द्यांवरुन भाजपाला लक्ष्य केलं. तर राज ठाकरेंना लक्ष्य करताना संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेला मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटाचा आधार घेतला. “मला एका शिवसैनिकाने चांगले सागितले. तो म्हणाला साहेब तुम्ही मुन्नाभाई चित्रपट पाहिलात का? त्या चित्रपटात संजय दत्तला गांधीजी दिसतात. गांधीजी बोलतात. मग हा गांधीगीरी करायला लागतो. आपल्याकडेही तशीच एक केस आहे. मी विचारलं की कोणती रे? तो म्हणाला अहो ती नाही का ज्याला स्वत:ला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. शाल घालून फिरतात हल्ली. कधी मराठीच्या नादाला लागतात. कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. मग मी म्हटलं अरे चित्रपटातील मुन्नाभाई लोकांचं भलंतरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई आहे. ही केमिकल लोचाची केस आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.