राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून मनसेने शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत रसद पुरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप केला होता. आता याच प्रकरणावर भाष्य करताना मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दक्षिणेत असा प्रकार झाला असता तर सर्व राजकीय पक्ष एकवटले असते असं म्हटलंय.

नेमकं फोटो प्रकरण काय?
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याआधी शऱद पवारांनीच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला रसद पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे. राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकला हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं आहे.

हे महाराष्ट्राचं दुर्देव
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये पवारांचा उल्लेख कथानकाचा निर्माता असा करत टोला लगावलाय. “आजचे फोटो समोर आल्याने या संपूर्ण कथानकामागील निर्माता कोण हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला कळालं आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातून कशी रसद पुरवली गेली हे त्यांनी भाषणात सांगितलं होतं. आजच्या फोटोवरुन त्या अर्थाला पुष्टी मिळाल्यासारखं आहे,” असं गजानन काळे म्हणालेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेच्या विरोधात सर्वच राजकीय पक्ष…
“महाराष्ट्रात चुकीचा पायंडा पडतोय. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा कुठलाही राजकीय दौरा नव्हता. दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर राजकीय मतभेद आणि अभिनिवेश बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष आणि सर्व राजकीय नेते एकत्र आले असते. दुर्देवाने महाराष्ट्रात असं घडताना दिसत नाही. मनसेच्या विरोधात सर्वच राजकीय पक्ष एकत्र येतात. आजच्या फोटोने हे सिद्ध झालंय,” असं गजानन काळेंनी म्हटलंय.