त्र्यंबकेश्वर मंदिर प्रश्नी १३ मे रोजी जी गोष्ट घडली त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर उरुस आयोजकांनी पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वराला धूप न दाखवण्याचा निर्णय घेतला. या मंदिराच्या मुद्द्यावरून जे काही घडलं त्यावरुन राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप झाले होते. याच बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. हा प्रश्न गावकऱ्यांनी सोडवायचा आहे इतरांनी त्यात लुडबूड करु नये असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?

“मला वाटतं की परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. तसंच हा जो काही विषय आहे तो संस्थांनाचा आणि गावकऱ्यांचा विषय आहे. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा मशिदी आहेत जिथे हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहतात. माहीमचा दर्गा आहे मकदुमबाबांचा तिथे उरुस असताना जी चादर चढवतात ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चढवतो. अशी अनेक उदाहारणं देता येतील. मला वाटतं जे परंपरा सुरु ठेवली पाहिजे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आपला आहे का? याआधी मी देखील दर्गा, मशिदींमध्ये गेलो आहे. मुस्लिम लोकंही मंदिरात येतात. आपलीच काही मंदिरं अशी आहेत जिथे काही जातींनाच गाभाऱ्यात जाऊ दिलं जातं.

कोत्या लोकांच्या वृत्तींनी वाद निर्माण केला आहे

मला वाटतं की या प्रकरणी जे वाद निर्माण केला आहे त्या माणसांची वृत्ती कोती झाली आहे. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. इतरांनी त्यात पडू नये, बाहेरच्या लोकांनी पडायची गरज नाही. यामध्ये कुणाला दंगली हव्या आहेत का? मी लाऊडस्पीकरचा विषय काढला, समुद्रातल्या दर्ग्यावर बोललो होतो, जे चुकीचं आहे तिथे कारवाई केलीच पाहिजे. गड-किल्ल्यांवर दर्गे आहेत ते हटवले गेलेच पाहिजेत तिथे त्यांचा काय संबंध? चुकीच्या गोष्टींवर प्रहार केलाच पाहिजे. पण जाणूनबुजून काहीतरी खोदून काढायचा त्याला काही अर्थ नाही. आणखी एक महत्त्वाचं, मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे कधीच दंगली होत नाहीत. त्यांचं सगळं बालपण, पिढ्या इकडे राहिलेल्या असतात. त्यामुळे अशा प्रकारे जे सामंज्यस आहे ते काही लोकांनी बिघडवू नये.” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे हे वादाचं प्रकरण?

त्र्यंबकेश्वर येथे १३ मे रोजी दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिर परिसरात थांबली. देवाला धूप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला. पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदूधर्मीयांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हा वाद चांगलाच चिघळला. या ठिकाणी आंदोलनही झालं. आता राज ठाकरेंनी या बाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसंच १०० वर्षांपासून सुरु असलेली प्रथा बंद करु नये असंही म्हटलं आहे.