महाराष्ट्रातील टोलनाक्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. टोल नाक्यांवरील नियमांच्या पायमल्लीवरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चाही केली होती. मात्र, अद्यापही टोल प्रशासनाकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा अनुभव राज ठाकरे यांना खालापूर टोलनाक्यावर आला आहे. खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा पाहून राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरले. तसेच, टोलनाक्यावरील अधिकाऱ्याला ठाकरी शैलीत राज ठाकरे यांनी खडेबोल सुनावले आहेत.

नेमकं काय घडलं?

पिंपरी-चिंचवड येथील शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटोपून राज ठाकरे मुंबईकडे निघाले होते. यावेळी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे येताना खालापूर टोलनाक्यावर लांबच्या-लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पिवळ्या रेषेच्या बाहेर वाहनांच्या रांग गेल्यास टोल न घेता वाहने सोडली जातात. मात्र, खालापूर टोलनाक्यावर लांबच्या-लांब वाहनांच्या रांगा पाहून राज ठाकरे संतापले.

राज ठाकरेंनी स्वत: गाडीतून उतरत वाहनांना टोलनाक्यावरून सोडलं. तसेच, रूग्णवाहिकेलाही राज ठाकरे यांनी रस्ता करून दिला आहे. यावेळी ठाकरी शैलीत टोल नाक्यावरील अधिकाऱ्याला राज ठाकरे यांनी दम दिला आहे.

“पुन्हा बांबू लावला, तर सगळ्यांना बांबू लावेन मी, एक जरी गाडी अडवली तर याद राखा. कुठपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात माहिती आहे का?” असे खडेबोल राज ठाकरे यांनी टोल नाक्यावरील अधिकाऱ्याला सुनावले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी खालापूर टोलनाक्यावर वाहनांना रस्त्या करून दिल्यानंतर मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले. मनसे कार्यकर्त्यांनी अनेक वाहने विना टोल सोडली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर काही गोष्टी सुचवण्यात आल्या होत्या. पण, सरकार किंवा टोलनाक्याच्या कंत्राटदारांना याचा विसर पडला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरून वसुली मास्टरला सांगितलं की, रूग्णवाहिकेला रस्ता द्या,” अशी प्रतिक्रिया एका मनसे कार्यकर्त्यानं दिली.