तीन वर्षांपूर्वी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापर्यंत हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा हॉट टॉपिक होता. मात्र, हा ऐतिहासिक निकाल आल्यानंतर आता अयोध्येचे दौरे हा हॉट टॉपिक ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अयोध्या दौऱ्यामुळे चर्चेत असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता हा दौरा स्थगित केल्यामुळे चर्चेत आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून राज ठाकरेंवर खोचक टोला लगावल्यानंतर आता काँग्रेसनं देखील राज ठाकरेंच्या या कृतीवर टोमणा मारला आहे. तसेच, राज ठाकरेंच्या खांद्यावरून थेट भाजपावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरवरून दौरा स्थगितीची केली घोषणा

राज ठाकरंनी आज सकाळीच ट्वीट करून अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाल्याचं जाहीर केलं आहे. “तूर्तास अयोध्या दौरा स्थगित! महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलू” असं म्हणत २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेमध्ये यासंदर्भात भूमिका मांडणार असल्याचं राज ठाकरेंनी या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे. यावरून काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टिप्पणी करणारं ट्वीट केलं आहे.

“हिंदुत्व वोटबँकेत वाटेकरी नको म्हणून…”

आपल्या ट्वीटमधून सचिन सावंत यांनी राज ठाकरेंची आणि मनसेची भाजपानं कुचंबणा केल्याचं म्हटलं आहे. “राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार आहे. सुरुवातीला हवा भरण्याचे काम भाजपानेच केले. पण हिंदुत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधीच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने काढता पाय घेतला. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जाणीवपूर्वक मनसेची कुचंबणा केली”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

“आपण भाजपाच्या हातात वापरले जातोय हे…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. “भाजपाने त्यांच्या बाबतीत असं का करावं. हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळी भाजपा असा खेळ करतं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेतं. त्यातलाच हा प्रकार मला दिसतोय. यातून एक शहाणपण काही लोकांना आलं, तर बरं होईल. यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं, महाराष्ट्राचं होतं. आपण भाजपाच्या हातात वापरले जातोय हे काही लोकांना उशीरा समजतं”, असं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, तूर्तास स्थगित याचा अर्थ पुढे होणार आहे, असं स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आलं आहे. “तूर्तास स्थगितचा अर्थ पुढे होईल असा आहे. जो नेता महाराष्ट्रहितासाठी राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतो, जो नेता राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांवर टीका करताना कचरत नाही, तो नेता एका खासदाराच्या बडबडण्याने आपला निर्णय बदलेल का? मीडिया आणि विरोधकांनी तूर्तास स्थगितचा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत. सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!” अशी फेसबुक पोस्ट मनसे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray ayodhya visit postponed congress sachin sawant tweet bjp pmw
First published on: 20-05-2022 at 14:22 IST