Raju Patil Reacts on MNS Ex KDMC Corporators Joins Shinde Shivsena : कल्याण डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) माजी नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या पत्नी ज्योती राजन मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी आज (२५ ऑगस्ट) त्यांच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे) जाहीर प्रवेश केला. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नव्या सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं. दरम्यान, या घटनेवर मनसेचे माजी आमदार व कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख नेते राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पाटील यांनी शिवसेनेवर (शिंदे) टीका देखील केली आहे.
राजी पाटील यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. ५० खोके घेऊन हे फुटले आणि आता इतरांना खोके वाटत फिरत आहेत. यांना काय कळणार इमान आणि निष्ठा म्हणजे काय? यांनी तर फक्त स्वार्थासाठी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केला आहे.”
“ज्यांना खांद्यावर घेतलं तेच डोक्यावर पाय देऊन…”, राजू पाटलांची उद्विग्न प्रतिक्रिया
राजू पाटील म्हणाले, “या मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला आहे. ज्यावेळी स्वत:ला मूल होत नाही तेव्हा दुसऱ्याचं मुल मांडीवर घ्याव लागतं. मिंधे गटाची हीच अवस्था आहे आणि ज्यांना खांद्यावर घेतलं तेच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले आहेत. पण या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.”
मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा व महाराष्ट्र सैनिकांचा शिवसेनेत (शिदे) प्रवेश
दरम्यान, माजी नगरसेवक राजन मराठे व बाबाजी पाटील यांच्याबरोबर मनसेचे उप शहराध्यक्ष किशोर कोशी, मनसे विद्यार्थी सेनेचे सुरज मराठे, रवींद्र बोबडे, संजय तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात आणि अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, शिवसेनेचे (शिंदे) कल्याण जिल्हाप्रमुख राजेश कदम आणि अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.