अमित ठाकरेंची गाडी अडवल्यामुळे समृद्धी महामार्गावरील एका टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा मुद्दा आता तापू लागला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व मनसेमध्ये ट्विटर वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात आधी भाजपानं एक व्हिडीओ पोस्ट करून अमित ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी त्यावर प्रत्युत्तर दिलं होतं. यावर आता मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून त्यात भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल करण्यात आला आहे.

नेमकं काय झालं?

शनिवारी शिर्डीहून नाशिकच्या दिशेने येत असताना समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरेंशी अरेरावी केल्याचा दावा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी अमित ठाकरेंसह इतर पदाधिकारी नव्हते. मात्र, त्यानंतर रात्री १० च्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली.

भाजपानं शेअर केला व्हिडीओ

यावरून आता भाजपानं एक व्हिडीओ ट्वीट करून अमित ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. “अमित ठाकरे, टोलनाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका व शिकवा”, असं या ट्वीटमध्ये भाजपानं म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांची चूक नसताना टोलनाक्याची तोडफोड केली गेली, असा दावा या ट्वीटमध्ये शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये आहे.

दरम्यान, भाजपाच्या या टीकेवर मनसेनं हल्लाबोल केला आहे. एकीकडे संदीप देशपांडेंनी “ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले, ते आम्हाला बांधण्याबद्दल काय शिकवणार? त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा आधी स्वत:चा पक्ष बांधावा”, अशी टीका केली असताना दुसरीकडे मनसेच्या ट्विटर हँडलवरून भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये “जर सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल नसते, तर इरशाळवाडीची दुर्घटना टळली असती व त्या निष्पाप जिवांचे प्राण वाचले असते”, हे अमित ठाकरेंचं विधान या ट्वीटसोबत देण्यात आलं आहे.

“ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले…”, अमित ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या भाजपावर मनसेचं टीकास्र!

“मनविसे अध्यक्ष अमित ठाकरेंचं हेच विधान इतकं झोंबलंय कि पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय”, असा टोला मनसेनं ट्वीटमध्ये लगावला आहे. “कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय ? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत ? बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात?” असे सवालही मनसेनं उपस्थित केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत आणि त्याचं सोयरंसुतक नसणारे निरंकुश सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत”, असंही या ट्वीटमध्ये मनसेनं नमूद केलं आहे.