निवडणूक आयोगाने नुकताच गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या १ आणि ५ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा, काँग्रेस, आम आदमी पार्टी अशा सर्वच पक्षांनी कंबर कसली असून या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र, या निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. शिवसेनेनं उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यात त्यांना यश मिळालं नाही. याचाच संदर्भ घेत आता राज ठाकरेंच्या मनसेनं ठाकरे गटावर खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना खातं उघडेलच, असा दावा त्यावेळी संजय राऊत यांनी केला होता. स्वत: आदित्य ठाकरेही उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी सभा घेऊन आले होते. मात्र, तरीही शिवसेनेला तिथे खातं उघडता आलं नाही. त्यावेळी शिवसेना राष्ट्रीय पक्ष म्हणून भविष्यात पुढे येईल, असा दावाही संजय राऊतांनी केला होता. यावरून मनसेनं ट्विटरवरून ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.

“उत्तर प्रदेशच्या भव्य यशानंतर…”

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. यामध्ये गुजरात निवडणुकांचाही संदर्भ त्यांनी दिला आहे. “राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल करणारी शी. ऊ. बा. ठा. या वेळेला गुजरात निवडणूक लढवणार? की उत्तर प्रदेशच्या भव्य यशानंतर माघार घेणार?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

“९५ साली अजित पवार कुठे होते? तेव्हा…”, ‘त्या’ विधानावरून शहाजीबापू पाटलांचा खोचक सवाल; जयंत पाटलांनाही टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरात निवडणुका भाजपा आणि काँग्रेसकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे माजी मुख्यमंत्रीही होते. या राज्यातली सत्ता राखण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेणाऱ्या आम आदमी पार्टीनं गुजरात निवडणुकांमध्येही आपला ठसा उमटवण्याचा चंग बांधल्यामुळे काँग्रेससाठी भाजपासोबतच आपशीही थेट सामना करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे ही तिरंगी लढत चुरशीची ठरली आहे.