बालिकेवरील बलात्कार प्रकरणानंतर परप्रांतीयांना मारहाण, त्यांच्या दुकानांची नासधूस केल्याप्रकरणी बुधवारी जुना राजवाडा पोलिसांनी मनसेच्या सोळा कार्यकर्त्यांना अटक केली. जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील आदींचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
कुटुंबातील लोकांना पोलिसांनी वेठीस धरल्याने आम्हाला नाईलाजाने पोलिसांसमोर हजर व्हावे लागले असल्याची प्रतिक्रिया मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. येथील कसबेकर हॉल परिसरात सोमवारी चौदा महिन्याच्या बालिकेवर परप्रांतीय तरूण राजेशसिंह बबलुसिंह याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. सोमवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना मारहाण केली होती. मंगळवारी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील अक्षय मेटल्स् या कारखान्यातील सुमारे २५ कामगारांना मनसैनिकांनी चोप दिला होता. तर ध्यानचंद हॉकी स्टेडियमजवळ परप्रांतीयाच्या गाडीतील साहित्य पेटवून दिले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवस शहर व परिसरात हुल्लडबाजी चालविली होती. ती आटोक्यातआणण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्रीपासून मारहाण करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा शोध चालविला होता. त्यातून काही कार्यकर्त्यांच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यामध्ये आणून बसविले होते. यामुळे कारवाईपासून दूर राहिलेल्या मनसैनिकांना पोलिसांसमोर शरण जाण्यावाचून पर्याय राहिला नव्हता.