गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवर जमावाने हल्ला केल्याची घटना बीड जिल्ह्यातील पारोडी (ता.आष्टी) येथे घडली. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यावेळी जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर दंगल नियंत्रक पथकास पाचारण करण्यात आले. याप्रकरणात पाच हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पोलीस कर्मचारी गुरुवारी सकाळी पारोडी (ता.आष्टी) वस्तीवर गेले होते. त्यापैकी दोन पोलीस कर्मचारी गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी वाहनातून खाली उतरले तर तिघे तिथेच थांबले. आरोपींना आणण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी प्रल्हाद देवडे व शिवदास केदार हे वस्तीवर गेले मात्र उपस्थित जमावाने त्यांना पाहताच त्यांच्या दिशेने दगडफेक करायला सुरुवात केली.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलिसांनी बचावात्मक पवित्रा घेतला, मात्र समोर जमाव मोठ्या प्रमाणावर होता. जमाव पोलिसांच्या दिशेने धावून आला आणि पोलिसांना काठ्यांनी मारहाण केली. जखमी दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : २३ वर्षीय तरुणीवर मंत्र्याच्या मुलाचा बलात्कार, आरोपीनं अटक करायला गेलेल्या पोलिसांच्या हातावर दिल्या तुरी

घटनेची माहिती कळताच आष्टीचे पोलीस उपाधिक्षक अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित बेभरे यांनी दंगल नियंत्रण पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वस्तीवर पोलिसांचा फौजफाटा पाहून काही जण फरार झाले. हल्ला प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.