Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीर्घ काळ प्रचारक असलेले मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावरच्या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी मोहन भागवत यांनी पंचहात्तरीची शाल अंगावर पडली की ती वेळ थांबायची असते असं एक विधान केलं. या विधानामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाले मोहन भागवत?
मोरोपंत यांच्याबाबतचं पुस्तकाचं महत्त्व हे प्रेरणा या दृष्टीने आहे. मोरोपंत यांच्या आयुष्यात सगळ्यांना चटक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे त्यांची भव्य शरीरयष्टी. त्यांनीच एक प्रसंग सांगितला होता. घरी पाहुणे आले की मुलं कोण आलं असं विचारतात. जेव्हा मी घरी जातो तेव्हा मुलं विचारतात आई हे काय आलं? अशी त्यांची शरीरयष्टी होती. बाल स्वयंसेवकांना त्यांचा आधार वाटत असे. तसंच त्यांचा स्वभाव अतिशय विनोदी होता अशीही आठवण मोरोपंत पिंगळे यांच्याबाबत मोहन भागवत यांनी सांगितली.
पंचहात्तरीबाबतचं मोहन भागवत यांचं विधान काय?
“मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले होते की जेव्हा पंचाहात्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, तुमचं वय झालं आहे; बाजूला सरा, आम्हाला काम करु द्या” ही आठवण मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितली. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोरोपंत पिंगळे : द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवत यांनी हे विधान केलं. त्यांचा रोख नेमका कुणाकडे ? याची चर्चा आता रंगली आहे.
मोहन भागवत यांनी मोरोपंतांची अशीही एक आठवण सांगितली
मोहन भागवत म्हणाले, “रामजन्मभूमीच्या आंदोलनाबाबत मोरोपंत पिंगळे यांना विचारलं गेलं की तुम्ही या आंदोलनाचे आर्किटेक्ट आहात. त्यावर ते क्षणाचाही विलंब न करता म्हणाले तुम्ही जे विचारायचं आहे ते अशोक सिंघल यांना विचारा. आंदोलन करायचं ठरलं म्हणून आम्ही त्यात सहभागी झालो. मी केलं हे सांगण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. डोंगराइतकं कर्तृत्व पण ते सगळं संघ शरण, मी केलं, मी ही होतो असंही त्यांनी कधी सांगितलं नाही. सामान्य माणूस कर्मामध्ये आसक्त होऊन काम करतात. लोकसंग्रह करणारेही लोक असेच आसक्त वाटतात पण ते निरासक्त असतात. मोरोपंतांनी जी सगळी कामं केली त्यात त्यांची रुची होती की नाही हे त्यांनाच माहीत. पण राष्ट्रकार्य करतो आहोत ही भावना होती. शिवाय कुठलंही काम त्यांनी करायचं म्हणून केलं नाही. जे काही केलं ते सगळं विचारपूर्वक केलं. मोरोपंतांसारखं व्हायला दृढनिश्चय लागतो, हा दृढनिश्चय समर्पणातून येतो.”