scorecardresearch

देशात बिघडलेल्या वातावरणाला समाजच जबाबदार-मोहन भागवत

नागपूर येथील कार्यक्रमात मोहन भागवत यांचं प्रतिपादन

संग्रहित छायाचित्र
देशात जे वातावरण बिघडलं आहे त्याला समाजच जबाबदार आहे असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये केलं. राजकारण हे कायम समाजातील भिन्न घटकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. राजकारणामुळे निर्माण झालेल्या द्वेषाला कितपत बळी करायचा याचा विचार समाजाने करायला हवा असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. गुरुवारी नागपुरात झालेल्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते.

समाजातलं वातावरण बिघडवणाऱ्यांची ताकद शून्य आहे. समाजातील सज्जनशक्तीच्या सद्गुण आणि कर्तृत्त्व यांचा अभाव यासाठी कारणीभूत आहे. समाजात जी परिस्थिती बिघडलेली आहे त्याला समाजच जबाबदार आहे असं भागवत यांनी म्हटलं आहे.

नागपूर गुजराती मंडळाद्वारे व्हीएमव्ही कॉमर्स, जेएमटी आर्ट्स आणि जेजेपी सायन्स कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सुवर्ण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे. अंधार कधीही अस्तित्त्वात नसतो. प्रकाशाचा अभाव अंधार दर्शवतो. त्याचप्रमाणे समाजात कर्तृत्त्वाचा अभाव निर्माण झाला की वातावरण बिघडतं. सध्या समाजात जे सुरु आहे त्याला अशीच काहीशी परिस्थिती जबाबदार आहे असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

आपल्याकडे विविधेत एकदा आहे असं म्हटलं आहे. मात्र आपल्याकडे आता एकतेमधली विविधता आली आहे असं म्हणायची वेळ आली आहे. आपली संस्कृती ही स्वार्थाची नाही तर आपुलकीची आहे. स्वार्थ आणि दरी निर्माण करणाऱ्या राजकारणाला समाजाने दूर ठेवलं पाहिजे अशीही अपेक्षा मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mohan bhagwat statement about indias current situation scj