मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्याबरोबरच काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला. मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. या मुद्द्याला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेत बोलताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, “दादर नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे सात वेळा खासदार होते. सात वेळा खासदार राहिलेला व्यक्ती आत्महत्या करतो. तेही मुंबईत येऊन. त्यांनी सुसाईड नोटमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यात त्यांनी दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. खेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. वारंवार अडचणी निर्माण केलं जात होत. सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या पटेल यांच्या माध्यमातून दिल्या जात होत्या, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी सभागृहात दिली.

आणखी वाचा- “सचिन वाझेंना आधी निलंबित करा”; हिरेन प्रकरणावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ

दादरा नगर हवेलीचे जे प्रशासक आहेत खेडा पटेल. ते पूर्वी भाजपा सरकारच्या काळात गुजरातचे गृहमंत्री होते. त्यावेळी कदाचित नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांची प्रशासक म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये असं म्हटलं आहे की, मी मुंबईत येऊन आत्महत्या करतोय, त्रास मला तिकडे असला तरी इथे आत्महत्या करतोय. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय महाराष्ट्रातच मिळेल. त्यांच्या पत्नीने कलाबेन मोहन डेलकर यांनी सुद्धा मला पत्र दिलेलं आहे. अभिनव मोहन डेलकर यांनीही पत्र दिलेलं आहे. यापूर्वी सांगितलेले आरोपच केलेले आहेत,” असं देशमुख म्हणाले.

आणखी वाचा- मनसुख हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला; फडणवीसांचा गंभीर आरोप

“त्यामुळे मोहन डेलकर यांच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी स्थापन करून करण्यात येईल. त्याचबरोबर नागपूरमध्ये छत्तीसगढमधील एका आयएएस अधिकारी राजेश कुमार श्रीवास्तव यांनीही नागपूरमध्ये येऊन आत्महत्या केली. त्यांचाही तोच उद्देश असावा. ज्या ठिकाणी राजेश श्रीवास्तव अधिकारी आहेत. त्यांना माहिती होत की, भाजपा सरकारकडून न्याय मिळणार नाही. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल,” असं देशमुख म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan delkar suicide case sit will investigation anil deshmukh bmh
First published on: 09-03-2021 at 14:19 IST