सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचे वेध लागले असून येत्या तीन दिवसात कोकण आणि गोव्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. २१ तारखेपर्यंत मान्सून कोकणात येईल आणि २४ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. याआधी १६ ते १८ जून या कालावधीत कोकण विभागात काही ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असतानाच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुखर होत आहे. कर्नाटकमध्ये पोहोचलेले मोसमी वारे महाराष्ट्रात पोहोचण्यास सध्या पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोणताही मोठा अडथळा निर्माण न झाल्यास दोन ते तीन दिवसांत त्यांचे राज्यात आगमन होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता.

राज्याने यंदाच्या उन्हाळी हंगामात तीव्र चटके सहन केले आहेत. विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या काही भागात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. बहुतांश ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे. राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस कोसळत असला, तरी दुष्काळी स्थिती दूर होण्यासाठी मोसमी पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र, यंदा मोसमी पावसासमोर विविध अडथळे निर्माण झाले आहेत. अंदमानात १८ मे रोजी दाखल झाल्यानंतर केरळमध्ये १ जूनला अपेक्षित असताना तेथे मोसमी वारे आठवडय़ाने उशिरा पोहोचले. त्यानंतर चांगली वाटचाल सुरू असताना चक्रीवादळाने त्यांची वाट रोखली. १३ ते १४ जूनला मोसमी वाऱ्यांचा प्रवेश महाराष्ट्रात होण्याचा अंदाज असताना चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने त्यांची प्रगती थांबली होती.

सद्य:स्थितीला चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. पुढील काही दिवसांत ते ओसरणार आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या प्रवासासाठी वाट मोकळी झाली आहे. मोसमी वाऱ्यांचा सध्या उत्तरेकडील प्रवास सुरू आहे.

दक्षिण कर्नाटकात दाखल झालेल्या वाऱ्यांनी मंगळुरू, म्हैसूपर्यंत मजल मारली असून, तमिळनाडूतील सालेम, कुड्डालोपर्यंत त्यांची प्रगती झाली आहे. त्रिपुरा, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागातही ते पोहोचले आहेत. बंगालच्या उपसागरावरूनही मोसमी वाऱ्यांची वाटचाल होणार आहे. रविवारी सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागात ते दाखल होणार असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले होते.

मराठवाडय़ात धरणांमध्ये साठा केवळ १.५७ टक्के
मराठवाडय़ातील दुष्काळाने धरणांनी तळ गाठलेलाच होता. आता केवळ १.५७ टक्के पाणीसाठा राहिला आहे. सध्या मराठवाडय़ात पिण्यासाठी तीन हजार ४९२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मराठवाडय़ात मोठे, मध्यम व लघु प्रकल्प मिळून ८७२ धरणे आहेत. मोठय़ा ११ धरणांपैकी केवळ नांदेड जिल्हय़ातील निम्न मनार धरणात ९ टक्के पाणीसाठा आहे. अन्य दहा धरणांमध्ये शून्य पाणीसाठा आहे. मराठवाडय़ातील ७५ प्रकल्पांपैकी बहुतांश धरणे कोरडी पडली आहेत.

पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भात तीव्र टंचाई
अमरावती :दुष्काळी स्थितीमुळे पश्चिम विदर्भातील पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली असून नजीकच्या काळात मान्सूनची दमदार हजेरी न लागल्यास टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर भर पडण्याची भीती आहे. पश्चिम विदर्भात सद्यस्थितीत ४२ तालुक्यांमधील ४०९ गावांमध्ये ४५२ टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon rain 24 june maharashtra weather department sgy
First published on: 17-06-2019 at 16:57 IST