गेल्या काही वर्षांत कोकणात पर्यटकांचा ओघ वाढता असून सुरक्षित कौटुंबिक पर्यटनासाठी कोकणाला जास्त पसंती दिली जात असल्याचे दिसून आले आहे.
दिवाळी किंवा उन्हाळ्यातील सुट्टीबरोबरच अलीकडील काळात नाताळच्या सुट्टीमध्येही कोकणात मोठय़ा संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळने विकसित केलेली गणपतीपुळे (रत्नागिरी) आणि तारकर्ली (सिंधुदुर्ग) ही सर्वात जास्त लोकप्रिय पर्यटनस्थळे आहेत. कोकणी पद्धतीची घरे, विशेष आरामदायी वातानुकूलित खोल्या, समुद्रदर्शन घडवणाऱ्या खोल्या गणपतीपुळे येथे आहेत. गेल्या १५ डिसेंबरपासून येत्या ४ जानेवारीपर्यंत त्या सर्व आरक्षित झालेल्या आहेत. तसेच तारकर्ली येथे वातानुकूलित आणि बिगरवातानुकूलित मिळून २० खोल्यांबरोबर ४ बांबू हाऊसेस आणि ४ हाऊसबोट्स आहेत. येथेही जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत खोल्या उपलब्ध नाहीत. आरक्षणाच्या ऑनलाइन पद्धतीमुळे पर्यटक नियोजनबद्ध रीतीने काही महिने आधीच या खोल्यांचे आरक्षण करतात, असे दिसून आले आहे.
या दोन सर्वात लोकप्रिय स्थळांबरोबरच अलीकडील काळात वेळणेश्वर (रत्नागिरी) आणि सागरेश्वर (वेंगुर्ले) ही स्थळेही पर्यटकांच्या पसंतीला उतरली आहेत. देवगड तालुक्यातील (सिंधुदुर्ग) समुद्रकिनारी असलेल्या कुणकेश्वर येथेही महामंडळातर्फे पर्यटनस्थळ विकसित केले जात असून पुढील वर्षी ते कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त महामंडळाच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्ह्य़ात १८७, तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात १२३ निवास व न्याहरी योजना चालू असून दरवर्षी हजारो पर्यटक या अभिनव सुविधेचा लाभ घेतात, असे दिसून आले आहे.
नाताळच्या सुट्टीत गोवा हे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. पण गेल्या काही वर्षांत कोकणचा निसर्गरम्य परिसर गोव्याशी स्पर्धा करू लागला आहे. या संदर्भात महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र पवार ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, कोकणात रमणीय सागरकिनारे आणि जैवविविधतेने नटलेली सह्य़ाद्रीच्या पायथ्याची गावे, अशी दुहेरी निसर्गसंपन्नता आहे. त्यामुळे पर्यटक येथे जास्त आकर्षित होऊ लागले आहेत. त्याचबरोबर, कोकणात पर्यटकांना जास्त सुरक्षित वाटते. त्यामुळे कौटुंबिक पर्यटनासाठी कोकणाला पहिली पसंती दिली जाते. येथील सागरकिनाऱ्यांवर किंवा दुर्गम खेडय़ात पर्यटकांना नेहमीच घरगुती आदरातिथ्याचा अनुभव येतो. त्यामुळे येथे पर्यटकांचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. महामंडळाच्या व्यवस्थेचा लाभ हजारो पर्यटक घेऊलागले आहेत. अशा विविध माध्यमांतून येथे दरवर्षी पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्यांची संख्या काही लाखांच्या घरात पोहोचली आहे.
अंगारकीला दोन लाख भाविक?
अंगारकी चतुर्थीला गणपतीपुळ्याच्या जागृत देवस्थानाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्याही दरवर्षी वाढत आहे. येत्या १ जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थी आहे. मागील अनुभव लक्षात घेता या दिवशी तेथे सुमारे दोन लाख भाविक गर्दी करतील, असा अंदाज आहे. त्या दृष्टीने सर्व सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2012 रोजी प्रकाशित
सुरक्षित कौटुंबिक पर्यटनासाठी कोकणाला जास्त पसंती
गेल्या काही वर्षांत कोकणात पर्यटकांचा ओघ वाढता असून सुरक्षित कौटुंबिक पर्यटनासाठी कोकणाला जास्त पसंती दिली जात असल्याचे दिसून आले आहे. दिवाळी किंवा उन्हाळ्यातील सुट्टीबरोबरच अलीकडील काळात नाताळच्या सुट्टीमध्येही कोकणात मोठय़ा संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत.
First published on: 29-12-2012 at 05:44 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More liking to konkan for secure family tourism