नवरात्रौत्सवापासून राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु झालेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे तीन कोटी ४४ लाख ४२ हजार ५५१ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील एकूण महिलांच्या संख्येपैकी ७३.८ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे. आरोग्य विभागाच्या या मोहीमेला महिलांनी मोठ्या प्रामाणात प्रतिसाद दिल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मोहिमेसाठी राज्यात एकूण चार कोटी ६६ लाख ६७ हजार ५५५ महिलांची नोंद झाली असून त्यापैकी तीन कोटी ४४ लाख ४२ हजार ५५१ महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. टक्केवारीच्या भाषेत हे प्रमाण ७३.८ टक्के असून यात आरोग्य विभागाच्या अंतर्गत ग्रामीण व जिल्हा स्तरावर झालेल्या एकूण महिलांपैकी ७७.२ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी पूर्ण झाली आहे, तर नागरी क्षेत्रात महापालिकांमध्ये ६६.८ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या आरोग्यमंत्र्यांच्या पुढाकारातून नवरात्रोत्सवात सुरु करण्यात आलेल्या अभियानात गेल्या तीन महिन्यात तीन कोटी ४४ लाख महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. या आरोग्य तपासणीत तीस वर्षांवरील २,०६,१५२ महिलांना मधुमेहाचा आजार असल्याचे आढळून आले आहे. तर, उच्च रक्तदाबाचे प्राथमिक निदान झालेल्या महिलांची संख्या ३,४४,६०६ इतकी आहे. आतापर्यंत ४१,४०६ महिलांची संशयित कर्करुग्ण म्हणून नोंद करण्यात आली असून आवश्यकतेप्रमाणे त्यांच्यावर पुढील चाचण्या व उपचार केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे, जवळपास २६,८२३ महिलांना हृदयविकाराचा त्रास असल्याचे दिसून आले तर १८,४५३ महिलांना गर्भाशय व मुख कर्करोगाची लक्षणे असल्याचे आढळून आले आहे.

६० वर्षावरील एक लाख दोन हजार महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली असून मानसिक आरोग्य व तंबाखू सेवन, इत्यादीविषयी सहा लाख ३१ हजार महिलांचे समुपदेशन करण्यात आले आहे. ६० वर्षांवरील जवळपास सव्वा लाख महिलांची काननाक व घसा तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यातील सर्व महिलांच्या आरोग्याची तपासणी पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरु राहील असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. तसेच आवश्यकतेनुसार उपचारही केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

तीस वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान नाक घसा व इतर आजारांचे निदान करण्यात येत आहे. शिबिरांमध्ये अतिजोखमीच्या मातांचे व महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया होतील याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या कालावधीत मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तज्ज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार असून भरारी पथकामार्फत देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये सेवा पुरविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाच्या समन्वयाने तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम आखण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सोनेग्राफी चाचणी व दंत व वैदयकीय शिबीरांचेही आयोजन अनेक ठिकाणी करण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून अंगणवाड्यांमध्ये आशा स्वयंसेविकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 3 crore women in the state took the benefit of health check up under the campaign mata surakshit tar ghar surakshit pvp
First published on: 14-11-2022 at 19:14 IST