सोलापूर : दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानल्या गेलेल्या अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर आणि शेजारच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उद्या रविवारी होणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाची जयत तयारी केली जात आहे. शनिवार आणि रविवार सलग दोन सुट्ट्यांचा योग आल्यामुळे अक्कलकोटमध्ये लाखापेक्षा जास्त भाविक दाखल होत आहेत.

वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरूपौर्णिमेनिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. विविध दूरच्या भागातील भजनी मंडळे दाखल झाली असून दिवसभर भजनांचा आनंद भाविकांना लुटता येणार आहे. प्रवचनेही होणार आहेत. नगर प्रदक्षिणा व अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने अवघी अक्कलकोटनगरी स्वामीमय झाली आहे. शहरात सर्वत्र रस्त्यांवर भगव्या पताका उभारण्यात आल्या आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व सचिव आत्माराम घाटगे यांच्या देखरेखीखाली भाविकांसाठी श्री दर्शनासह निवास व महाप्रसादाचे उत्तम नियोजन केले जात आहे. विशेषतः दर्शन रांगेत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून कापडु मंडप उभारण्यात आला असून पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा – सांगली : पश्चिम घाटात संततधार सुरूच, महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टीतून १ लाख क्युसेकचा विसर्ग

हेही वाचा – दिवसाउजेडी दोन सदनिकांतील सात लाखांचा ऐवज लंपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदिरालगत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातही गुरूपौर्णिमेचा दिमाखदार सोहळा संपन्न होत असून गुरूपौर्णिमेच्या दिवशीच अन्नछत्र मंडळाचा ३७ वा वर्धापन दिन असल्यामुळे मंडळाच्या विस्तीर्ण प्रांगणात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक सोहळ्याची सांगता समारंभपूर्वक होत आहे. ज्येष्ठ गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर व त्यांच्या कन्या राधा मंगेशकर यांच्यासह आघाडीचे गायक महेश काळे, आर्या आंबेकर, आदेश बांदेकर यांच्या कलाविष्काराला भाविक व प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. समीर चौगुले, प्रभाकर मोरे, ओंकार राऊत, ईशा डे, नम्रता संभेराव, चेतन भट आदी कलावंतांची ‘हास्य जत्रा’ तुफान गाजली. सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्या ‘भक्तिरंग’ कार्यक्रमासह निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या कीर्तनाने रंगत आणली. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले व प्रमुख कार्याकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या अधिपत्याखाली गुरूपौर्णिमा आणि अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे एक लाख भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाणार आहे. अन्नछत्र मंडळाच्या भक्तनिवासामध्ये पाच हजारापेक्षा जास्त भाविकांची निवास व्यवस्था झाली असून संपूर्ण भक्तनिवास भरून गेले आहे. दरम्यान, अन्नछत्र मंडळाने सुमारे ६५ कोटी रुपयांचा खर्चाच्या पाच मजली महाप्रसादगृहाची उभारणी हाती घेतली आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजनही गुरूपौर्णिमेला होत असल्याचे अमोलराजे भोसले यांनी सांगितले.