रवींद्र जुनारकर

नक्षलवादी सामान्य आदिवासींची हत्या करून भीती व दशहत पसरवण्याचे काम करीत असतानाच आज बुधवारी १२ लाखाचे बक्षीस असलेल्या माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी (३४) व भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम (६३) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले. टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची ही यशस्वी कामगिरी मानली जात आहे.

आत्मसमर्पित नक्षलवादी रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम हा मार्च २००५ ला अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत झाला. तीन महिने पेरमिलीमध्ये कार्यरत होता. मे २००५ पासून तो माड डिव्हिजन टेक्नीकल दलममध्ये कार्यरत होता. २००७ ते २०१२ पर्यंत उप-कमांडर पदावर कार्यरत होता. २०१२ ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर पर्यंत कार्यरत होता. रामसिंगवर १ खून, १ चकमक व इतर १ असे एकूण ३ गुन्हे दाखल आहेत. मौजा कासमपल्ली, गुंडुरवाही, हीकेर, आशा-नैनगुडा, आलदंडी चकमकीत तो सहभागी होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामसिंगवर ३ तर माधुरीवर ३७ गुन्हे दाखल

माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी ही नोव्हेंबर २००२ ला कसनसुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन डिसेंबर २०१२ पर्यंत कार्यरत होती. डिसेंबर २०१२ ते २०१३ पर्यंत ती भामरागड दलममध्ये कार्यरत होती. फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलममध्ये ती एसीएम पदावर कार्यरत होती. माधुरीवर ४ खून, २१ चकमक, ७ जाळपोळ आणि इतर ५ असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत. मौजा वेळमागड, कसनासुर व माडवेली चकमकीमध्ये ती सहभागी होती. शासनाने रामसिंग ऊर्फ सिताराम आत्राम याच्यावर ६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन मट्टामी हिच्यावर देखील ६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. नक्षलवादींनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल यांनी यानिमित्ताने केले आहे.