गारपीटग्रस्त शेती पिकांच्या नुकसानीतून वगळलेल्या शेतक-यांना न्याय मिळण्यासाठी सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, शेतक-यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना भेटून गाऱ्हाणे मांडले असता त्याची दखल घेत गारपीटग्रस्त शेतीच्या नुकसानीची फेरतपासणी करून न्याय देण्याची ग्वाही जिल्हाधिका-यांनी दिली.
जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.  उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आदी तालुक्यांतील गारपीटग्रस्त शेतक-यांच्या शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांची यादी प्रसिध्द न केल्यामुळे या शेतक-यांची उपेक्षा होत आहे. तर, प्रसिध्द झालेल्या यादीत अनेक शेतक-यांना वगळण्यात आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावच्या ६२० शेतक-यांची नावे गारपीटग्रस्त शेतक-यांच्या यादीतून वगळण्यात आल्याचे या गावचे शेतकरी राजाभाऊ गरड यांचे म्हणणे आहे. नुकसान भरपाई मिळालेल्यांपैकी ठराविक शेतक-यांनाच नुकसान भरपाईचा लाभ मिळाला, तर बहुसंख्य शेतक-यांना तुटपुंजी मदत मिळाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतक-यांनी गारपीटग्रस्त शेतीच्या नुकसानीपोटीच्या शासकीय मदत कामांमध्ये भेदभाव होत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले, तर जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेतला.