सांगली : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) कडून होत असलेल्या चौकशीचा निषेध करण्यासाठी गुरूवारी सांगली व मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. तसेच या बाबतचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.

विरोधी पक्षाच्या नेत्याविरूध्द केंद्र सरकार जाणीवपूर्वक कारवाईचा फार्स करीत असून या विरोधात आज सांगलीमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सूडाच्या भावनेतून वागणार्‍या केंद्रातील सरकारचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस  बाळासाहेब पाटील, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे, राहूल पवार, फिरोज मुा, हारूण खतीब, संदीप व्हनमाने आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>Budget 2024 : अर्थसंकल्पावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया, मराठा आरक्षणाचा उल्लेख करत म्हणाले…

मिरजेतील किसान चौक येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी नायब तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब व्हनमोरे, तालुकाध्यक्ष वास्कर शिंदे, बापूसाहेब बुरसे, संताजीराव गायकवाड आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.