लोकसभा निवडणूक रंगात आली असताना ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष मात्र मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाकडे लागले आहे. ३ एप्रिल रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी अनेक सदस्यांनी आपली वर्णी लागावी यासाठी नेतेमंडळींकडे मनधरणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेमध्ये वर्चस्व असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची बैठक बुधवारी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये होणार असून प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक माजी आमदार शिवाजीराव कावेकर हे सदस्यांची मते जाणून घेणार आहेत. इच्छुकांची संख्या वाढल्याने नेमकी कोणाला संधी द्यायची याचा पेच काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झाला आहे.    
जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर अध्यक्षपदी संजय मंडलिक यांची निवड झाली होती, तर उपाध्यक्षपदी हिंदुराव चौगुले यांची वर्णी लागली होती. लोकसभा निवडणुकीची समीकरणे बदलल्यानंतर मंडलिकांनी काँग्रेसचा त्याग करून शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावर हंगामी अध्यक्षपदी हिंदुराव चौगुले यांची निवड झाली. चौगुले यांनी आपल्याला मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. याशिवाय परशुराम तावरे, राहुल देसाई, अमल महाडिक, शशिकांत खोत, एकनाथ पाटील, उमेश आपटे अशी अनेकांची नांवे पुढे येऊ लागली आहेत. या सर्वांनी आपल्या नेत्यांची भेट घेऊन अध्यक्षपदासाठी संधी मिळण्यासाठी विनवणी चालविली आहे.     
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या गटासाठी असून नव्याने होणाऱ्या अध्यक्षासाठी अवघ्या सहा महिन्यांची मुदत मिळणार आहे. त्यामुळे अल्पकाळासाठी हे पद घ्यावे का याबाबतची शंकाही कांही सदस्यांना जाणवत आहे. तसेच, अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच संपल्यानंतर पाठोपाठ उपाध्यक्ष निवडीचा गोंधळही सुरू होणार आहे. या दोंन्हीतून मार्ग काढतांना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी.एन.पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक यांची डोकेदुखी वाढली आहे.